अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील खानापूर येथील आग लागून घरे जळाल्याची घटना ताजी असताना; सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या चिंचोली गवळी (ता.मोर्शी) येथे आज सकाळी सात वाजता भीषण आग लागली. आगीत झोपडपट्टी भागातील सात घरे पूर्णपणे जळून खाक झाले. यामध्ये सुमारे 20 लाखांचे नुकसान झाले आहे.
हिरावती अळसपुरे, मंदा नवडे, योगीराज पाटील, मदन डांगे, महिपल सिंग बावरी,चंद्रकला पाटील, प्रमोद पाटील यांच्या घरांना आग लागली होती. आगीने रौद्ररूप धारण केले होते. यावेळी जोरदार वाऱ्यामुळे ही आग इतरत्र पसरली. यामुळे अग्निशामक दलाची गाडी येण्यापूर्वीच सर्व घरे जळून खाक झाली. सकाळी सात वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची माहिती प्रल्हाद पकडे यांनी पोलिसांना व अग्निशामक दलाला दिली. आग विझवण्यासाठी मोर्शी नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आल्यानंतर दुपारी बारा वाजताच्या दरम्यान ही आग आटोक्यात आली.