अमरावती -भुकेलेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, उघड्यानागड्यांना वस्त्र, गरीब मुला-मुलींना शिक्षण, बेघरांना आसरा, अंध, पंगू, रोग्यांना औषधोपचार, बेकारांना रोजगार ,पशुपक्षी मुक्या प्राण्यांना अभय, गरीब तरुण-तरुणींचे लग्न आणि दुःखी व निराश यांना हिम्मत अशी दशसूत्री सांगून समाजाला वैचारिक दृष्टिकोन देऊन डोळसपणे जगण्याची शिकवण देणारे कर्मयोगी संत गाडगे महाराज यांची आज 65 वी पुण्यतिथी ( 65th Death Anniversary of Karmayogi Sant Gadge Maharaj ) आहे. गाडगेबाबांना जाऊन मोठा कालावधी उलटला असला तरी त्यांच्या स्मृती मात्र आजही जागृत आहे.
... म्हणून पुलाचे नाव पडले गाडगेबाबा सेतू -
'गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या कीर्तनाच्या माध्यमातून देव माणसात ओळखा आणि अंधश्रद्धेला बळी न पडता डोळसपणे जगण्याची दृष्टी समाजाला मिळावी यासाठी आयुष्य खर्ची घालणाऱ्या संत गाडगे महाराज यांचे 20 डिसेंबर 1956 रोजी वलगाव ते अमरावती मार्गावर असणाऱ्या पेढी नदीच्या पुलावर मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. मुंबई-नाशिक पंढरपूर अशा सततच्या दौऱ्यावर असणाऱ्या गाडगेबाबांची प्रकृती 1956 च्या नोव्हेंबर महिन्यापासून खालावली होती. बरं वाटत नसल्यामुळे 7 डिसेंबर 1956 रोजी संत गाडगेबाबा अमरावतीला परतले होते. अमरावतीत डॉक्टर शहा यांच्याकडे त्यांच्यावर उपचार सुरू होते. 13 डिसेंबर रोजी गाडगेबाबांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे त्यांना अमरावतीच्या इर्विन रुग्णालयात ( Irwin Hospital Amravati ) दाखल करण्यात आले. बाबांना न्यूमोनिया डायबेटिक कामा नावाचा आजार जडला होता. बाबांना जरा बरे वाटायला लागल्यामुळे त्यांनी चांदूर बाजार तालुक्यात असणाऱ्या नागरवाडी येथे जाण्याची इच्छा व्यक्त केली. संत गाडगेबाबा 20 डिसेंबर 1956 च्या रात्री साडेआठच्या सुमारास चांदूरबाजार या गावात आले होते. चांदुर बाजार वरून नागरवाडीला जायचा रस्ता हा कच्चा असल्यामुळे त्यांना अनेकांनी सकाळी नागरवाडी ला जाण्याचा आग्रह धरला. रात्री अकरा वाजता संत गाडगे बाबांनी नागरवाडी जाण्याचा हट्ट धरला असताना डॉक्टरांनी मात्र त्यांना त्वरित अमरावतीला हलविण्याचा सल्ला दिला. त्यावेळी गाडगे बाबांची गाडी अमरावतीच्या दिशेला वळविण्यात आली. गाडगेबाबांची गाडी अमरावती पर्यंत पोहोचली असताना वडगावच्या पेढी नदीवरील पुलावर गाडी असताना बाबांनी अखेरचा श्वास घेतला. ज्या पेढी नदीच्या पुलावर गाडगेबाबांनी प्राण त्यागले तो पूल आज संत गाडगेबाबा सेतू म्हणून ओळखला जातो.
तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत गाडगेबाबांना अग्नी -
संत गाडगेबाबा गेलेत ही माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना भुसावळ रेल्वे स्थानकावर कळली. इकडे गाडगे महाराजांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कुठे करावे याबाबत अनेकांचे भिन्न मते होती. मी आल्याशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही, असे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी भुसावळ येथून अमरावतीला कळवले होते. दुसर्या दिवशी दुपारपर्यंत तुकडोजी महाराज अमरावती पोहोचले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या उपस्थितीत संत गाडगेबाबांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गाडगे महाराजांच्या पत्नी कुंताबाई या सुद्धा उपस्थित होत्या. ज्या ठिकाणी गाडगेबाबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याठिकाणी गाडगे महाराजांची समाधी उभारण्यात आली. आज याच ठिकाणी गाडगे महाराजांची सुंदरशी मूर्ती स्थापन करण्यात आली असून या परिसरालगत जी नागरी वसाहत वसली आहे तो संपूर्ण परिसर गाडगेनगर म्हणून ओळखला जातो.
तुकडोजी महाराजांनी वाहिली श्रद्धांजली