अमरावती- जिल्ह्यात रविवारी (दि. 28 जून) 38 कोरोना रुग्ण आढळले आहेत. एकाच दिवशी सापडलेल्या कोरोना रुग्णांचा हा अमरावतीतला सर्वात मोठा आकडा आहे. शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आता कोरोनाचा नवा हॉटस्पॉट झाले आहे.
कोरोनामुळे अमरावतीत रविवारपर्यंत 23 जण दगावले असून 389 रुग्ण बरे होऊन आपापल्या घरी गेले आहेत. रविवारी 38 कोरोना रुग्ण आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 32, 37 आणि 45 वर्षीय परिचारिका, 40 आणि 20 वर्षीय परिचर, प्रयोगशाळेत काम करणारा 60 वर्षीय कर्मचारी कोरोनाबधित झाले आहेत.
अंजनगाव सुर्जी येथे 5 कोरोनाग्रस्त आढळून आले असून नांदगाव खंडेश्वर ग्रामीण रुग्णालयातील 34 वर्षांच्या कर्मचाऱ्यालाही कोरोना झाला आहे. अमरावती शहरातील अशोक नगर परिसरात 6 कोरोनाग्रस्त समोर आले आहेत. नावसरी परिसरात 18 वर्षांच्या युवतीलाही कोरोना झाला आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहालगत असलेल्या वडाळी परिसरात 32 वर्षांच्या पुरुषाला कोरोनाची लागण झाली आहे. परतवाडा शहरातील सायमा कॉलनी येथील 50 वर्षाच्या पुरुषाला कोरोना असल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे.