अमरावती: अकोट वन्यजीव विभागातील शहानूर येथे सर्वेक्षणाचा शुभारंभ झाला. तिथून सर्व सहभागींपैकी प्रत्येकी दोन निरीक्षक याप्रमाणे ३० पथके मेळघाटातील चार विभागांत विविध ठिकाणी रवाना झाली. सर्वेक्षणाच्या पहिल्या व दुसऱ्या दिवशी प्रत्यक्षात पक्षी अभ्यास व नोंदणी करण्यात आली. त्यानंतर या सर्व माहितीची ई-बर्ड या संकेतस्थळावर तसेच प्रपत्रांमधे लिखित स्वरुपात नोंद करण्यात आली.
मेळघाटातील पक्ष्यांची यादी:प्राथमिक माहितीनुसार, यापूर्वी नोंद झालेल्या २९४ पक्षी प्रजातीपैकी सुमारे २१३ प्रजातींचे पक्षी नोंदविण्यात आले आहेत. या अभ्यासातून या पक्ष्यांची संख्या व काही पक्षी प्रजातींची सद्य:स्थिती कळण्यास मदत होणार आहे. सर्वेक्षणात मेळघाटच्या यादीत यापूर्वी समाविष्ट नसलेले सुमारे १० प्रजातींचे पक्षी प्रथमच नोंदविण्यात आले. या नवीन नोंदीमुळे मेळघाटातील पक्ष्यांची यादी तीनशेवर पोहोचली आहे. मेळघाटात प्रथमच नोंदविण्यात आलेल्या पक्ष्यांमधे हिमालयन रुबीथ्रोट, गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार, सोनेरी डोक्याचा वटवट्या, रेषाळ गळ्याचा सुतार, मोठा राखी खाटिक व काळ्या पंखाचा कोकिळ खाटिक हे काही दुर्मिळ पक्षी, तसेच शेंडी बदक व तरंग बदक या सारखे स्थलांतरित पाणपक्षी नोंदविण्यात आले आहेत.
पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण:मेळघाटचे वैभव असलेला रानपिंगळा अनेक पक्षी अभ्यासकांसाठी आकर्षण ठरला. हा पक्षी सर्वेक्षणात अनेक ठिकाणी आढळून आला. तो अनेकांना प्रथमच बघायला मिळाला. मेळघाटात प्रथमच आढळून आलेले पक्षी हे मेळघाटातील पुनर्वसन झालेल्या गावठाण क्षेत्रातील विकसित झालेल्या गवताळ अधिवासात आढळून आले आहेत. मेळघाटमधून २० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या कुंड या ठिकाणी पक्षी अभ्यासक श्री. मिलिंद सावदेकर व सामिष डोंगळे यांना गुलाबी गोमेट, लांब शेपटीचा गोमेट, काश्मिरी माशीमार हे तीन पक्षी आढळून आले. हिमालयन रूबीथ्रोट या सुंदर पक्ष्याची नोंद रोहित शर्मा यांनी वान अभयारण्यातील बारुखेडा या ठिकाणी घेतली.