अमरावती - शिकारीच्या उद्देशाने एका शेतातील विहिरीच्या सभोवताली चार शिकाऱ्यांनी टाकलेल्या जाळ्यात अडकलेल्या 15 जंगली कबुतरांची सुटका करण्यात वनविभाग व पक्षी मित्र असलेल्या वसा संस्थेला यश आले. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील उत्तमसरा गावात हा प्रकार घडला असून शिकऱ्याकडून 15 जंगली कबुतरांना पक्षीमित्रांनी सोडवून त्यांचे प्राण वाचवले. नंतर काही जखमी झालेल्या कबुतरांवर उपचार करून त्यांना वन विभागाच्या स्वाधीन करण्यात आले.
अमरावतीत पक्षीमित्रांनी वाचवले १५ जंगली कबुतरांचे प्राण, वन विभाग आणि वसा संस्थेची संयुक्त कार्यवाही
मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान काही शिकाऱ्यांनी गावात येवून एका शेतातील विहीरीजवळ पक्षी पकडण्यासाठी जाळे टाकले. या जाळ्यात 15 जंगली कबूतर अटकले. हा प्रकार गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी वसा संस्थेला ह्या घटनेची माहिती दिली. यानंतर वनविभाग व पक्षी मित्र असलेल्या वसा संस्थेने या ठिकाणी जाऊन जाळ्यात अडकलेल्या 15 जंगली कबुतरांची सुटका केली.
मंगळवारी सकाळी सहाच्या दरम्यान चार शिकारी उत्तमसरा गावात शिरले. गावानजीक असलेल्या शेतात त्यांनी जंगली कबुतरांच्या शिकारीसाठी जाळे लावले. जाळ्यावर टाकलेल्या धान्याकडे इतर कबुतर आकर्षित होऊन ती सुद्धा जाळ्यात अडकली. हा प्रकार गावकऱ्यांच्या नजरेत पडला, त्यांनी लगेच जखमी प्राण्यांसाठी कार्यरत असलेल्या वसा संस्थेला ह्या घटनेची माहिती दिली. वसा संस्थेचे सहायक पशु चिकित्सक शुभम सायंके, पक्षीमित्र भूषण सायंके, निखिल फुटाणे, मुकेश मालवे, पंकज मालवे आणि गणेश अकर्ते यांनी शेतात जाऊन पडताळणी केली असता त्यांना ४ शिकारी पक्षी पकडण्याच्या जाळ्यासह आढळले, त्यांच्याकडे जखमी अवस्थेत 15 कबुतरे सुद्धा मिळाली.
वसा संस्थेतर्फे तत्काळ ही माहिती वन विभागाला देण्यात आली. विभागाचे उपवनसंरक्षक श्री. गजेंद्र नरवणे आणि वन परिक्षेत्र अधिकारी कैलास भुम्बर यांच्या मार्गदर्शनाखाली शिकार प्रतिबंध पथकाचे वनरक्षक अमोल गावणेर, उमक आणि ठाकूर यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पण, तोपर्यंत 4 ही शिकाऱ्यांनी काढता पाय घेतला.