अमरावती -येथील बेलपुरा परिसरात सोमवारी मध्यरात्री पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांपैकी 15 जणांना राजापेठ पोलिसांनी अटक केली आहे. तर, मंगळवारी दिवसभर बेलपुरा भागात पोलीस बंदोबस्त कायम होता.
पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 15 जणांना अटक; इतरांचा शोध सुरू, बेलपुरा भागात कडक बंदोबस्त
अमरावतीच्या बेलपुरा भागात दोन गटात झालेल्या हाणामारीदरम्यान घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवर हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणी राजापेठ पोलिसांनी १५ जणांना अटक केली असून इतरांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोमवारी रात्रीच्या सुमारास बेलपुरा परिसरात दोन गटात हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोर शेळके हे घटनास्थळी दाखल झाले. मात्र, यावेळी जमावाने पोलिसांवर हल्ला चढविला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक शेळके आणि दोन शिपाई जखमी झाले होते. यानंतर पोलीस उपायुक्त शशिकांत सातव, पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांच्यासह 150 पोलीस बेलपुरा परिसरात दाखल झाले. रात्री उशीरापर्यंत प्रत्येक घरात जाऊन धरपकड मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही जण फरार झालेत तर 15 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. जखमी पोलिसांना उपचारासाठी रात्रीच रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्या पोलिसांची प्रकृती चांगली असून त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तसेच, बेलपुरा भागात ज्याठिकाणी दोन गटात हाणामारी झाली त्या ठिकाणी मंगळवारी दिवसभर पोलीस बंदोबस्त कायम होता. या प्रकरणात 15 जणांना अटक केली असून आणखी काही जणांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांनी दिली.