महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Amla Vishweshwar: आमला विश्वेश्वर येथे अनोखी यात्रा; महाप्रसादाला 100 क्विंटलची भाजी, एकाचवेळी बसते दोन ते अडीच हजार जणांची पंगत

अमरावती जिल्ह्यात चांदुर रेल्वे तालुक्यात विदर्भा नदीच्या काठावर वसलेले आमला विश्वेश्वर मंदिर आहे. येथे सलग 70 वर्षांपासून संत एकनाथ महाराज यांची सात दिवसांची यात्रा आयोजित केली जाते. या यात्रेचे वैशिष्ट्य म्हणजे संत एकनाथ महाराजांच्या जयंतीनिमित्त यात्रेत येणाऱ्या पन्नास हजार भाविकांसाठी भोजन यज्ञ केला जातो. या भोजन यज्ञासाठी 100 क्विंटलची भाजी 30 क्विंटल कणिक आणि 20 क्विंटल तांदूळ लागतो.

By

Published : Feb 6, 2023, 12:03 PM IST

Updated : Feb 6, 2023, 12:48 PM IST

Amravati News
महाप्रसादाला 100 क्विंटलची भाजी

आमला विश्वेश्वर येथे अनोखी यात्रा; महाप्रसादाला 100 क्विंटलची भाजी

अमरावती :आमला विश्वेश्वर येथील यात्रेत होणाऱ्या भोजन यज्ञासाठी पहाटे चार वाजल्यापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. चांदुर रेल्वे कृषी उत्पन्न बाजार समितीतील अनेक व्यापारी या यात्रेनिमित्त संपूर्ण भाजीपाला यात्रेत देतात. तसेच गावातील शेतकऱ्यांसह परिसरातील गावातील अनेक शेतकरी आपल्या शेतातील भाजीपाला थेट यात्रेत महाप्रसादासाठी आणतात. ट्रकभर वांगी, फुलकोबी, पत्ताकोबी, पालक, बटाटे लसूण, कांदे असा भाज्यांचा ढीग यात्रेतील स्वयंपाकाच्या ठिकाणी लागतो. या स्वयंपाकासाठी साडेपाचशे लिटर तेल देखील लागते. एका व्यक्तीने स्वतः पंधरा लिटरचे 25 डबे स्वयंपाकासाठी दिले तर पंधरा लिटरचे दहा डबे हे ग्रामस्थांनी आणले.

स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण : गावातील प्रत्येक घरातील महिला, पुरुष, युवक भोजन यज्ञासाठी लागणाऱ्या स्वयंपाकात सहभागी होतात. कुणी भाजी चिरतो, कुणी तांदूळ निवडतो, काहीजण पीठ मळतात तर काहीजण पोळ्या करतात. शंभर क्विंटलची भाजी तयार करण्यासाठी मोठी कढई चुलीवर ठेवली जाते. पहाटे पाच वाजल्यापासून सायंकाळी चार वाजेपर्यंत या कढईत 25 वेळा भाजी तयार केली जाते. हा स्वयंपाक करताना देवाचे नामस्मरण तसेच जयघोष करीत उत्साहाचे वातावरण निर्माण केले जाते.



पहिली पंगत पाहुण्यांची :आमला विश्वेश्वर येथील संत एकनाथ महाराजांच्या यात्रेला लगतच्या अनेक गावांमधून तसेच गावातून अमरावती नागपूर पुणे मुंबई वसलेले सारेच लोक दरवर्षी येतात. अडीच हजार घरांचे गाव असणाऱ्या आमला विश्वेश्वर येथील प्रत्येक घरात यात्रेनिमित्त पाहुणे येतात. यात्रेत काल्याचे कीर्तन झाल्यावर महाप्रसादाची पहिली पंगत पाहुण्यांची बसते. एकाचवेळी दोन ते अडीच हजार जणांची ही पंगत असते. सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्री दहा वाजेपर्यंत महाप्रसादाचे वितरण केले जाते. विशेष म्हणजे बाहेर गावावरून आलेल्या अनेक पाहुण्यांना त्यांच्या घरी नेण्यासाठी देखील महाप्रसाद डब्यात दिला जातो अशी माहिती संत एकनाथ महाराज मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. डेरे आणि विश्वस्त राजेश गोफणे यांनी सांगितले.


दुसऱ्या दिवशी महाप्रसाद : संत एकनाथ महाराजांच्या जयंती पर्वावर बाहेर गावावरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी भोजन यज्ञ केला जातो. आमला येथील ग्रामस्थ दुसऱ्या दिवशी आपल्या घरातील स्वयंपाकाचे साहित्य आणून यात्रास्थळी स्वयंपाक करतात. पहिल्या दिवशी बाहेर गावच्या लोकांचा महाप्रसाद दिला जातो. दुसऱ्या दिवशी आमला विश्वेश्वर येथील प्रत्येक घरातील व्यक्ती यात्रास्थळी महाप्रसाद घेतो. ही यात्रा म्हणजे गावातील लोकांचे स्नेहसंमेलन असल्याची भावना आमला विश्वेश्वर येथील ग्रामस्थ अशोक सोनारकर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा: One Hour Mobile Never वन अवर मोबाईल नेव्हर मोबाईल संस्कृतीतून बाहेर पडण्यासाठी माजी नगरसेवकाची अभिनव संकल्पना

Last Updated : Feb 6, 2023, 12:48 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details