अमरावती - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचा विषाणू झपाट्याने पसरत आहे. त्यातच नवी दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझ मधील धार्मिक कार्यक्रमातून झालेल्या कोरोनाच्या प्रसारामुळे देशभरात खळबळ माजली आहे. अशातच अमरावती जिल्ह्यातील चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावातील दोन मशीदेमध्ये पोलिसांनी तपासणी केली. यात १० जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गुरुवारी सायंकाळी या सर्व लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून सर्वांचे रिपोर्ट हे सामान्य आहेत.
अमरावतीच्या शिरजगाव कसब्यातील मशीदीमधील १० जणांना 'क्वारंटाईन' हेही वाचा-जम्मू-काश्मीरमधील 4-G इंटरनेट सेवा सुरू करावी; सर्वोच्च न्यायालयात याचिका..
चांदुर बाजार तालुक्यातील शिरजगाव कसबा या गावात दोन मशीद आहेत. या मशीदीत वर्षभरात अनेक ठिकाणाहून लोक जमातीसाठी येत असतात. अशातच अकोला जिल्ह्यातून जमातसाठी आलेले १० लोक मागील २० ते २५ दिवसांपासून वास्तव्यास याठिकाणी होते. देशात लॉकडाऊन जारी केल्यानंतर बाहेर गावातून आलेल्या लोकांनी माहिती प्रशासनाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले होते. तरीही यांची माहिती प्रशासनाला देण्यात आली नव्हती.
दरम्यान, दिल्ली मधील मरकझ प्रकरणानंतर पोलिसांनी या दोन्ही मशीदीची तपासणी केली. यात प्रत्येक मशीदीत ५ -५ लोक आढळून आले. गुरुवारी त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, त्यांचे रिपोर्ट हे सामान्य आले आहेत. आता पुढील १४ दिवस त्यांना विलगीकरण कक्षात ठेवल जाणार आहे.
दरम्यान, देशातील 32 राज्यांसह केंद्रशासित प्रदेशांनी 31 मार्चपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन जाहीर केले होते. मात्र, हा आदेश झुगारुन लोक रस्त्यावर गर्दी करत आहेत. आवश्यकता भासल्याने संचारबंदी लागू करण्याचे निर्देश केंद्राने दिले होते. त्यानंतर 24 मार्चला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांसाठी अखेर देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याचा आज 10 वा दिवस आहे.