अमरावती- आज दुसऱ्या टप्यातील लोकसभा निवडणूक अमरावती लोकसभा मतदार संघात पार पडत आहे. परंतु जिल्ह्यातील पेंढी नदी प्रकल्पग्रस्त असलेल्या भातकुली तालुक्यातील गोफ गव्हाण या गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला. त्यामुळे या गावकऱ्यांच्या एकतेपुढे निवडणूक विभागालाही दिवसभर शांतच बसावे लागले.
अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गोफगव्हाण गावात शून्य टक्के मतदान
अमरावतीच्या भातकुली तालुक्यातील गोफ गव्हाण या गावातील ५८० प्रकल्प ग्रस्त गावकऱ्यांनी मतदानावर पूर्णपणे बहिष्कार टाकला.
आज अमरावती लोकसभा मतदार संघाची निवडणूक पार पडत आहे. परंतु, या गावातील प्रकल्प ग्रस्तांनी आज या मतदानावर बहिष्कार टाकला आहे. या गावातील प्रकल्पग्रस्त लोकांच्या यामध्ये जमिनी गेल्या असून लोकांना अतिशय तोकडा मोबदला मिळाला. मागील अनेक वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही या प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या नशिबी निराशाच आली. त्यामुळे या गावातील लोकांनी एकजूट होऊन अनेकदा शासनाला निवेदन देऊन पाठपुरावा केला. परंतु यासंदर्भात कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. तसेच राजकीय नेत्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा त्यांनी निर्णय घेतला.
त्यानुसार आज गोफगव्हाण या गावात ठिकठिकाणी गावकऱ्यांनी निषेधाचे फलक लावले. गावातील ५८० मतदारांपैकी एकाही गावकऱ्याने मतदान न केल्याने मतदान केंद्र आज ओस पडलेले होते. दरम्यान, आज या गावात ३ वाजेपर्यंत एकही मतदान झाले नसल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.