अकोला- दोन वर्षाच्या चिमुकलीला पाण्यात बुडवून स्वतःला जाळून घेऊन एका मातेने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली. डाबकी रोड पोलीस ठाण्याअंतर्गत येत असलेल्या गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मध्ये हा प्रकार घडला आहे. आनंदी इंगोले, असे चिमुकलीचे नाव असून रुपाली इंगोले, असे आत्महत्या केलेल्या मातेचे नाव आहे.
दोन वर्षाच्या मुलीला पाण्यात बुडवून मातेने घेतले पेटवून
गजानन नगरातील गल्ली नंबर 2 मध्ये राहणारे गिरीधर इंगोले हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांची पत्नी दोन वर्षांची मुलगी हे घरी होते. त्यांची मोठी मुलगी जान्हवी ही शेजारी खेळत होती. तर त्यांची सासू बाहेर इंधन आणायला आणि सासरे कामानिमित्त बाहेर गेले होते. दुपारी रुपाली इंगोले यांनी प्रथम चिमुकली आनंदीला घरात असलेल्या पाण्याच्या टाकीत बुडविले. त्यानंतर रुपाली इंगोले यांनी आधी गळफास घेण्याचा प्रयत्न केला. तो प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर तिने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली.
हेही वाचा - नोकरांनीच केला होता दुकानात हात साफ ; पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सासू-सासरे घरी आल्यानंतर त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी आरडाओरड केल्यानंतर परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने डाबकी रोड पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले. दोन वर्षाच्या चिमुकली आनंदीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले. हा प्रकार मुलीचा खून करून आत्महत्या केल्याचा आहे की या मागील दुसरे काही कारण आहे, याबाबत पोलीस तपास करीत आहेत. तसेच या घटनेमागील कारणांचाही शोध घेत आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय नाफडे पुढील तपास करीत आहे.
हेही वाचा - सावकारीबाबतच्या कारवाईतील नावे उघड; कोट्यवधींच्या व्यवहाराची चौकशी सुरू