अकोला- शासनाच्या योजनांवर अवलंबून न राहता सामूहिकरीत्या शेतीचा विकास करता येतो, यासाठी लागते केवळ एखाद्याचे मार्गदर्शन. स्वतःची जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छाशक्ती या गोष्टी जुळून आल्या तर सारं काही शक्य आहे. याचा परिचय करून दिला तो पातुर तालुक्यातील 51 शेतकऱ्यांनी.
शून्य ऊर्जेवरील सिंचन शेती; दोन तालुक्यात प्रकल्प यशस्वी या शेतकऱ्यांनी कालव्याचा किंवा विजेचा वापर न करता आपल्या शेतातील पिकांपर्यंत पाणी नेले आणि बारामाही 24 तास पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून घेतली आहे. कालव्याच्या माध्यमातून सिंचनासाठी पाणी देताना होणारे दुष्परिणाम लक्षात घेऊन आता शासनाने बंद पाइपमधून सिंचनासाठी पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी अद्याप अकोल्यात झाली नसली तरी एका ध्येयवेड्य सेवानिवृत्त अभियंता हरिदास ताठे यांनी या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करून दाखविली आहे.
शून्य ऊर्जेवरील सिंचन शेती; दोन तालुक्यात प्रकल्प यशस्वी या ध्येयवेड्या अभियंत्याने यापूर्वी अकोट तालुक्यातील दुर्गम भागात हा प्रयोग राबवला. हा प्रयोग यशस्वी झाल्याने प्रभावित झालेल्या पातुर तालुक्यातील कोठारी खुर्द येथील हिमंतराव टप्पे यांनी हा उपक्रम आपल्या गावात राबविण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी थेट अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या अंबाडी या आदिवासी गावाला भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या कार्यालायातून सेवानिवृत्त झालेल्या आणि धरण तलाव यातील थेंब अन थेंब सिंचनासाठी वापरला गेला पाहिजे या ध्येयाने पछाडलेल्या हरिदास ताठे यांची हिमंतराव टप्पे यांनी भेट घेतली.
शून्य ऊर्जेवरील सिंचन शेती; दोन तालुक्यात प्रकल्प यशस्वी हरिदास ताठे यांनी मोरणा प्रकल्पातील 51 शेतकरी लाभार्थ्यांना एकत्र केले. त्यांना या उपक्रमाचे फायदे समजावून सांगितले. मोरणा प्रकल्पातील पाणी पाच किलोमीटरपर्यंत दूर नेऊन 250 एकर बागेत पाईपच्या माध्यमातून पोहोचवले.
शून्य ऊर्जेवरील सिंचन शेती; दोन तालुक्यात प्रकल्प यशस्वी हरिदास ताठे यांनी पाईपलाईनचे डिझाईन करून दिले. कोणत्याही प्रकारे वीज न वापरता तुमच्या शेतातील पिकांपर्यंत पाणी पोहोचण्याची त्यांनी हमी दिली. धरणापासून पाच किलोमीटरपर्यंत पाईपलाईन, व्हॉल्व, खोदाई आदीसाठी 1 कोटी 20 लाखांचा खर्च आला. बुलडाणा अर्बन बँकेतून कर्ज मिळाले. प्रकल्पात 51 शेतकरी सहभागी झाले. या शेतकऱ्यांच्या शेतात कोणत्याही प्रकारे वीज न वापरता शेतातील पिकांपर्यंत पाणी पोहोचले आहे. ताठे यांनी सर्वप्रथम अकोट तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या अंबाडी या आदिवासी शेतकऱ्यांना पाण्यासाठी आत्मनिर्भर बनविले. आता पातुर तालुक्यातील कोठारी येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी आत्मनिर्भर बनविले आहे. जिल्ह्यातील वान प्रकल्प, पोपटखेड धरण आणि चिंचपाणी धरणावर काम चालू असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यास अकोला जिल्ह्यातील 23 हजार हेक्टर जमीन वीज वापराविना बंद पाइपद्वारे ओलीताखाली येणार आहे. दोन तालुक्यातील शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आल्याने आणि 24 तास बारामाही पाणी उपलब्ध झाल्याने पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत शेतकऱ्यांनी लिंबू, संत्रा, मोसंबी, पेरु, केळी, हळद, साग आदी पिके घेणे सुरू केले आहे.