अकोला - पातुर तालुक्यातील अंबाशी या गावामध्ये पाणी भरण्याच्या कारणावरून दोन कुटुंबात गुरुवारी वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्याने यामध्ये एकाची हत्या झाली असून दोन जण जखमी आहेत. पातूर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून या घटनेचा तपास करण्यात येत आहे. यामध्ये काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहेत. बाळू मोहाळे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे. दोन्ही कुटुंबानी एकमेकांविरोधात तक्रारी केल्या आहेत.
अंबाशी या गावांमध्ये सार्वजनिक नळ आहे आहे. या नळावर क्रमवारीने पाणी भरण्यात येते. गावातील जयाबाई विश्राम सरकटे, भाग्यश्री सरकटे व निशा वानखडे या पाणी भरत होत्या. पाणी पुरवठा सकाळी आठ वाजता बंद होत असल्याने मंदा सोनू तेलगोटे यांनी जया सरकटे यांना पाण्याचा एक कॅन भरू द्या, असे म्हटले. यावेळी जया सरकटे व मंदा तेलगोटे या दोघीमध्ये वाद झाला. यानंतर निशा वानखेडेने आकाश सरकटे यास घरून बोलावून घेतले.
वाद विकोपाला गेल्यानंतर आकाश सरकटे याने मंदा हीची आई विजयमाला सहदेव मोहाळे यांच्या डोक्यात पाणी भरायच्या भांड्याने मारहाण केली. यानंतर आकाशची बहिण भाग्यश्री राजेश खंडारे हिने त्यांना मारहाण केली. यावेळी आकाशने खिशातील चाकू काढून विजयमाला मोहाळे यांच्या हातात मारला. त्यानंतर हा प्रकार पहात मंदा तेलगोटे यांचे काका बाळू सदाशिव मोहाळे हे भांडण सोडविण्यासाठी आले.
बाळू मोहाळे येताच आकाशने त्यांच्या डोक्यात काठी मारली. ते जखमी होऊन खाली पडले. त्यानंतर आकाश वानखडे व ज्योती रुपेश सरकटे यांनी त्यांच्या हातातील काठीने बाळू मोहाळे यांना मारहाण करून गंभीर जखमी केले यात त्यांचा मृत्यू झाला. जया सरकटे व निशा वानखेडे यांनी मिळून मंदा तेलगोटे यांनाही मारहाण केली.
त्यानंतर मंदा सरकटे यांनी पातुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. यामध्ये आकाश सरकटे, रुपेश सुरेश सरकटे, आकाश अशोक सरकटे, जया विश्राम सरकटे, ज्योती रुपेश सरकटे, भाग्यश्री राजेश सरकटे, निशा आकाश वानखेडे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. यामध्ये पातूर पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले आहे.
हाणामारीप्रकरणी दुसऱ्या गटातील फिर्यादी निशा आकाश वानखडे राहणार नांदखेड हल्ली मुक्काम अंबाशी हिने ही पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार सोनू नाजुकराव तेलगोटे ,मंदा सोनू तेलगोटे ,बाळू मोहाळे, बलदेव मोहाळे, देवराव मोहाळे ,विजय मोहाळे ,नेहा बलदेव मोहाळे ,विजयमाला सहदेव मोहाळे यांच्यावर विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे