अकोला- शहरात व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यासाठी आयसीएमआरने अंतिम परवानगी दिली आहे. त्या पारश्वभूमीवर शहरात काल व्हीआरडीएल लॅब सुरू करण्यात आली आहे. लॅब सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी २५ जणांचे स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आले आहे. त्याचे अहवाल ८ ते १० तासांमध्ये येणार असल्याची माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी दिली.
प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग योजना अंतर्गत येणाऱ्या विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालय स्तरावर स्थापन करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात ६ ठिकाणी ही प्रयोगशाळा उभारण्यात आली असून त्यामध्ये शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेचा समावेश आहे. राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे मार्फत घेण्यात आलेल्या गुणवत्ता चाचणीमध्ये अकोला जीएमसी पास झाल्याने प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आयसीएमआरकडे अंतिम परवानगी मागण्यात आली होती. या लॅबमध्ये अकोला, वाशिम, बुलढाण्यातील नमुने तपासण्यात येणार आहेत. या लॅबची दिवसाला ८० नमुने तपासण्याची क्षमता आहे. यामध्ये कोरोना, स्वाइन फ्लू इतर विषाणूजन्य आजारांचे निदान होणार आहे.