अकोला - राज्य सरकारने धार्मिक स्थळे सुरू करण्याची परवानगी दिली. परंतु, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली नाही. धार्मिक कार्यक्रम सुरू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी विश्व वारकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. आंदोलन मंडपातच कीर्तन, प्रवचन करण्यात येत असल्यामुळे अकोलेकरांचे आंदोलनाकडे लक्ष वेधले आहे. राज्य सरकार मात्र या आंदोलनाबाबत गंभीर दिसत नसल्याची प्रतिक्रिया विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष गणेश महाराज शेटे, विठ्ठल महाराज साबळे, महिला कीर्तनकार अर्चना निंबोकार यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना व्यक्त केली.
हेही वाचा -कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी बाजार समिती संचालकांनी दिला आंदोलनाचा इशारा
कोरोना महामारीचा परिणाम अजूनही संपलेला नाही. सर्व व्यवस्था सुरू झालेली असताना राज्य सरकारने उशिरा का होईना धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली. मात्र मंदिरे उघडी केली. परंतु, धार्मिक कार्यक्रमांना अजूनही परवानगी दिली नाही. लग्न, कार्यक्रम यांना 100 व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये परवानगी दिली आहे. मात्र, धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याने विश्व वारकरी सेनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत सरकार या आंदोलनाची दखल घेत नाही. तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहणार असल्याची प्रतिक्रिया गणेश महाराज शेटे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली.