अकोला - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने नियमांच्या बंधन घालत सर्वच व्यवसाय सुरू ठेवले आहे. मात्र, धार्मिक कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. वारकऱ्यांमुळेच कोरोना सर्वात जास्त वाढतो का? असा सवाल विश्व वारकरी सेनेचे राजाध्यक्ष हभप गणेश शेटे महाराज यांनी राज्य सरकारला विचारला आहे. कोरोना आणि निर्बंध या संदर्भात हभप गणेश शेटे महाराज यांच्याशी 'ईटीव्ही भारत'चे प्रतिनिधी जीवन सोनटक्के यांनी संवाद साधला असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
बीज उत्सवाला परवानगी नाकारली आहे-
देहू येथे संत तुकाराम महाराजांचा बीज उत्सव 29 मार्च रोजी होत आहे. या उत्सवाला राज्य सरकारने अद्यापही परवानगी दिलेली नाही. तरीही सर्व वारकरी देहू येथे बीज उत्सवात सहभागी होणार आहेत. जो संप्रदाय तुकाराम महाराजांच्या काव्यावर आधारित आहे. त्या संप्रदायालाही सरकार थांबवू शकणार नाही. सरकारने बीज उत्सवात वारकऱ्यांना जाण्यास परवानगी दिली नाही, तर वारकरी कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास तयार असल्याचा इशारा विश्व वारकरी सेनेचे राज्य अध्यक्ष हभप गणेश शेटे महाराज यांनी दिला आहे.
राज्य सरकार धार्मिक कार्यक्रमाच्या विरोधात-
कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. ही परिस्थिती गंभीर आहे. मात्र, राज्य सरकारने सर्वच व्यवसायांना परवानगी दिली आहे. मात्र धार्मिक कार्यक्रमांवर बंदी आणली जात आहे. मग व्यवासाय केल्यास कोरोना वाढत नाही का? असा प्रश्न उपस्थित करीत हभप शेटे यांनी राज्य सरकार धार्मिकतेच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे.
राज्याचा महसूल वाढावा म्हणून सरकार मद्याची दुकाने उघडी करण्याची परवानगी देते. तर जीवनावश्यक वस्तू सोबत इतरही वस्तूंच्या दुकानांना व्यवसाय करण्याची परवानगी देते. जो महाराष्ट्र धार्मिकतेच्या व परंपरेच्या आधारावर उभा आहे. त्याच महाराष्ट्रात आज धार्मिक कार्यक्रमांवर राज्य सरकारने बंदी आणलेली आहे. त्यामुळे ही बंदी उठविण्यात यावी यासाठी वारकरी संप्रदाय मोठ्या प्रमाणात आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा शेटे महाराज यांनी दिला आहे.