अकोला: बाळापुर आणि अकोला तालुक्यातील 69 गावांमध्ये वाण धरणाचे पाणी मिळविण्यासाठी असलेल्या योजनेला स्थगिती दिल्याच्या विरोधात आमदार नितीन देशमुख यांनी अकोला ते नागपूर पायदळ वारी केली होती. बाळापूर विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी महाविकास आघाडी सरकारात असताना, वाण धरणातील पाणी हे बाळापुर व अकोला तालुक्यातील अशा एकूण 69 गावांना मिळावे, यासाठीची योजना राज्य शासनाकडून मंजूर केली होती. या योजनेचे काम जवळपास 70 टक्के पूर्ण झाले आहे. तर भाजप आणि शिंदे गटाच्या सरकारने ही योजना स्थगित केली. त्यामुळे या योजनेचे काम रखडले आहे.
योजना अचानक केली बंद:69 गावातील ग्रामस्थांना पाण्यासाठी राबविण्यात आलेली ही योजना अचानक बंद करण्यात आल्याने या विरोधात बाळापूरचे आमदार तथा ठाकरे गटाचे नेते नितीन देशमुख यांनी खारपाणपट्ट्यातील खारे पाणी जमा करून, हे पाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी नेण्यासाठी अकोला ते नागपूर पदयात्रा काढली. या यात्रेला नागपूर येथे पोलिसांनी अडवले होते.
धरणे आंदोलन केले सुरू: दरम्यान, ठाकरे गटाचे आंदोलन संपत नाही तोच वारी धरणावर तेल्हारा व अकोट येथील ग्रामस्थांनी ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांच्या आंदोलनाच्या विरोधात धरणे आंदोलन सुरू केले आहे. प्रहारचे प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू आहे. वाण धरणाचे पाणी हे सिंचनासाठी आवश्यक आहे. हे पाणी सिंचनासाठीच जास्त आरक्षित असल्यामुळे या पाण्याचा परिसरातील 14 हजार हेक्टर वरील शेतकऱ्यांना या पाण्याचा फायदा होत आहे. त्यामुळे हे पाणी कुठल्याही गावाला देऊ नये, अशी मागणी या शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या योजनेवरील स्थगिती उठू नये, यासाठी हे ग्रामस्थ व शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत.