अकोला -पातुर तालुक्यातील आदिवासी पांढुर्णा गट ग्रामपंचायतीमधील सोनूना गावात किरकोळ कारणावरून येथील काही समाजधुरिणांच्या सांगण्यावरून पोलीस पाटील व त्यांच्या कुटुंबीयांवर ग्रामस्थांनी बहिष्कार घातला आहे. एवढेच नाही तर त्यांना किराणा, दळण व पाणी देण्यावरही बंदी घातली आहे. विशेष म्हणजे, सोनुना गावचे पोलीस पाटील यांनी चांन्नी पोलीस स्टेशनला पंधरा दिवसापूर्वी तक्रार दिली होती. आतापर्यंत त्यांनी तीन तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, पोलिसांकडून या प्रकरणाची दखल न घेतल्यामुळे बहिष्कार टाकणाऱ्यांवर अद्याप कुठलीही कारवाई झालेली नाही.
पातूर तालुक्यातील सर्वात शेवटचे आणि जंगलातील गाव म्हणजे पांढुर्णा आणि त्यानंतर सोनूना हे दोन गाव आहेत. या दोन गावांना मिळून गट ग्रामपंचायत पांढुर्णा आहे. सोनूना गावाची लोकसंख्या सहाशे ते साडेसहाशे आहे. तर पांढुर्णा गावाची लोकसंख्या बाराशेपर्यंतची आहे. ही दोन्ही गावे आदिवासीबहुल आहेत.
पोलीस प्रशासनाचा गावपातळीवर दुवा म्हणून पोलीस पाटील काम करतात. मात्र, पोलीस पाटलाला न्याय मिळत नसल्यामुळे त्यांनी पातुर तहसील आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे दाद मागण्याचे ठरविले. मात्र, या गंभीर प्रकाराची दखलच घेतली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पोलिसांना मदत करणाऱ्या पोलीस पाटील यांच्याकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केले आहे.
पोलिसांकडे तीन वेळा तक्रारी देऊनही दुर्लक्ष -
काहींच्या सांगण्यावरून ग्रामस्थांनी कदम कुटुंबीयांवर बहिष्कार घातला. याबाबत पोलीस पाटील रमेश कदम यांनी चांन्नी पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार केली. परंतु, त्यांच्या तक्रारीची एकदाही दखल घेतली नाही, असा आरोप त्यांनी केला आहे.
काय आहे वादाचे कारण -
पोलीस पाटील कदम यांच्या शेतात सामाजिक सभागृह बांधून त्याला मंदिराचे स्वरूप देण्याचा निर्णय गावातील पुढारी म्हणून मिरविणाऱ्यानी घेतला. यावेळी कदम यांनी शेतात बांधकाम करण्यापूर्वी माझी परवानगी घेतली नाही, असे त्यांना विचारल्यावर त्यांनी कदम परिवाराला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर त्यांनी कदम कुटुंबावर बहिष्कार घालण्याचा ग्रामस्थांची बैठक घेऊन निर्णय घेतल्याचा आरोप आहे.
पोलीस अधीक्षकांनी दिले गुन्हे दाखल करण्याचे आदेश -
सोनूना गावचे पोलीस पाटील यांच्यावर बहिष्कार झाल्याची तक्रार दाखल झाली आहे. याप्रकरणात तक्रारदार यांचा जबाब नोंदविल्यानंतर त्यामध्ये संबंधित गावातील नागरिकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, अशी माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली आहे.