अकोला- कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या वर्षभरापासून नागरिक घरातच आहेत. काही नागरिकांनी या वेळेचा सदुपयोग करत घरासमोरील जागेत, तर काहींनी टेरेस गार्डन करून उत्तम प्रकारे परसबागा तयार केल्या आहेत. यादरम्यान, अनेक नागरिक महाबीजच्या शिवनी येथील बीज प्रक्रिया केंद्रांमध्ये जाऊन तेथे रोपटे खरेदी करीत होते. नागरिकांची ही गरज भागविण्यासाठी महाबीजच्या शिवनीतील बीज प्रक्रिया केंद्राने परसबाग भाजीपाला बियाणे कीट तयार केली आहे. ही कीट शेतकऱ्यांसाठी व बाग तयार करणाऱ्यांसाठीही फायदेशीर आहे. त्याबरोबरच यामुळे महिलांनाही दोन महिन्यांचा रोजगार मिळाला आहे. तसेच महाबीजलाही या किटमुळे लाखो रुपयांचे उत्पन्न झाले आहे.
मजुरांनाही काम मिळावे यासाठी परसबाग भाजीपाला बियाणे कीट केली तयार
टेरेस बाग तयार करण्यासाठी नागरिकांनी महाबीजच्या शिवनी येथील बीज प्रक्रिया केंद्र येथे येऊन नर्सरीमधील विविध प्रजातींच्या रोपांची लागवड केली. तर काहींनी भाजीपाला तयार करण्यासाठी बियाणे घेतली. यामुळे महाबीजला फायदा झाला. परंतु, तेथे काम करणाऱ्या महिला मजुरांना रोजगार मिळणे बंद झाले होते. विशेष करून, फेब्रुवारी आणि मार्च या दोन महिन्यात या मजुरांना कुठलेही काम नव्हते. त्यामुळे या मजुरांनाही काम मिळावे, परसबाग तयार करणाऱ्यांना देशी भाजीपाला वाणाचे बियाणे उपलब्ध करून द्यावे, शेतकऱ्यांनाही जोडधंदा मिळावा म्हणून भाजीपाला बियाणे कमी दरात उपलब्ध व्हावे या संधीचा फायदा करून महाबीजला उत्पन्न मिळावे. या उद्देशाने शिवनी येथील विभागीय व्यवस्थापक जगदीश खोडक यांनी यासाठी परसबाग भाजीपाला बियाणे कीट तयार केली आहे.
घरी भाजीपाला उगवण्यासाठी फायदेशीर