अकोला- दिल्लीमध्ये केंद्राने पास केलेल्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दर्शवला आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 17 डिसेंबर रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती भारिप-बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठीत खंजीर खुपसून अदानी आणि अंबानी यांना मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट करण्यासाठी संधी देत आहे. या केंद्र सरकारच्या कृषी कायद्यामुळे शेतकरी देशोधडीला जाणार असून यामुळे शेतकरी हा भूमिहीन होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यासोबतच स्वस्त धान्य दुकानामधून गरिबांना मिळणाऱ्या धान्याला ही गरिबांना या कायद्यामुळे मुकण्याची भीती निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे हे आंदोलन योग्य असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त करीत दिल्लीतील शेतकर्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला आहे, अशी माहिती प्रदीप वानखडे यांनी दिली.