अकोला- देश पातळीवर राजकीय नेतृत्व नाही हे आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिसून आले आहे. तीच गत महाराष्ट्राचीही झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर निर्णय ढकलून मोकळे होतात. आता शाळेबाबतही राज्य शासन निर्णय शाळांवर ढकलून मोकळे झाले, अशा निर्णयाचा आम्ही धिक्कार करतो, अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्णयाचा समाचार घेतला.
राज्यात शाळा सुरू करायच्या की नाही हा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अधांतरी होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय जिल्हा पातळीवर ढकलून दिला. याचाच अर्थ यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नाही. राजकीय नेतृत्व नाही, दूरदृष्टी नाही आणि बेभरवशावर हे राज्य सोडून दिले आहे. ही अवस्था 'जाणता राजा'ची पण असल्याची खरमरीत टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली.