वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांचे मत अकोला : जिल्हामध्ये गेल्या पाच टर्मपासून जिल्हा परिषदेवर वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) आपला झेंडा फडकवीत आहे. जिल्हा परिषदेवर (ZP Election) निर्विवाद विजय मिळविणाऱ्या वंचितने यावेळी 266 ग्रामपंचायतमध्ये सरपंच पदावर असलेल्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मिशन सरपंच इलेक्शनचे (Mission Sarpanch Election) शिवधनुष्य हाती घेतले आहे. 203 ग्रामपंचायतीवर (Grampanchayat Election) वंचितचे अधिकृत सरपंच पदाचे उमेदवार उभे आहेत. तर ग्रामपंचायत ही ताब्यात घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे सर्वच पदाधिकारी ठिकठिकाणी सहभागी होऊन मतदारांना आकर्षित करीत असल्याची परिस्थिती ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने आहे.
वंचित बहुजन आघाडीने झोकली ताकद :ग्रामपंचायतची निवडणूक 18 डिसेंबर रोजी जिल्ह्यात होत आहे. या निवडणुकीच्या तयारीसाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ग्रामपंचायत सोबतच सरपंच पदाचे निवडणूक रिंगणात उभे केले आहेत. वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अनेक पॅनल ग्रामपंचायतमध्ये आपले नशीब आजमाहित आहेत. इतर सरपंच पदाच्या उमेदवारांमध्ये मैत्रीपूर्ण लढत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी सांगितले आहे. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या व सरपंच पदाच्या निवडणुकीच्या तयारीसाठी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष ते पंचायत समिती सभापती व सदस्यांना विविध ठिकाणी उमेदवारांसाठी सभा घेण्याचे फर्मान जारी केले आहे. यामध्ये पक्षाचे पदाधिकारी यांनाही तशा सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी किती ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविते, याकडे लक्ष लागलेले असतानाच किती सरपंच पद हे आपल्या नावावर करते याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.
भाजपकडून ही सरपंच पदासाठी चाचपणी :वंचित बहुजन आघाडीने केलेल्या दाव्यानंतर जिल्ह्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षानेही 266 ग्रामपंचायतमधील सरपंच पदाच्या उमेदवारांना पक्षाच्या बाजूने निवडून आणण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. जिल्हाध्यक्ष तथा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर यांनी त्यादृष्टीने ज्येष्ठ पदाधिकारी व इतर सर्व सेलच्या पदाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहे. तसेच भाजप व इतर अपक्षांनासोबत घेऊन भाजप सरपंच पदाच्या निवडणुकीत जास्तीत जास्त सरपंच निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे चित्र आहे.
इतर पक्षांचे मात्र मौन :ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये पॅनल उभे करून स्थानिक स्तरावरील उमेदवार हे निवडणूक लढवितात या निवडणुकीमध्ये पक्षाचा कुठलाही अजेंडा नसल्यामुळे या निवडणुकीत राजकीय पक्ष लक्ष घालीत नसतात. मात्र, यावेळी सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार असल्यामुळे वंचित बहुजन आघाडीने उमेदवार सरपंच पदासाठी उभे केलेले असतानाच या पदाच्या निवडणुकीमध्ये मात्र काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व इतर पक्षांकडून एकही उमेदवार नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारा संदर्भामध्ये या पक्षांकडून प्रचारा संदर्भात मौन बाळगण्यात येत असल्याचे चित्र आहे.
आधीपेक्षा जास्त पदे मिळविणार :जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी जिल्ह्यात आधीपेक्षा जास्त सरपंच पद पक्षाकडे खेचून आणणार असल्याचा दावा वंचितचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केला आहे. जिल्ह्यात परिषदेच्या पक्षातील सर्व सदस्यांना तसेच पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सरपंच पदाच्या प्रचारासाठी बैठकी घेण्याच्या सूचना अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केल्या असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देडवे यांनी सांगितले.