अकोला - शिवसेनेने दसरा मेळावा भरवल्यास भारतीय बौद्ध महासभेची मिरवणूक व सभा होईलच, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी सांगितले आहे. भारतीय बौद्ध महासभेचे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी अकोल्यात संमेलन भरते. प्रकाश आंबेडकर यांची सभा देखील आयोजित करण्यात येते. मात्र यंदा कोरोनामुळे सर्व कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत.
शिवसेनेचा दसरा मेळावा होत असेल तर, बौद्ध महासभेची सभा घेऊच - वंचितचा इशारा भारतीय बौद्ध महासभेतर्फे दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी मिरवणूक काढण्यात येते. त्यानंतर मोठी सभा घेण्यात येते. या सभेला वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर मार्गदर्शन करत असतात. हजारो नागरिकांची या सभेला उपस्थिती असते. भारिप बहुजन महासंघ, वंचित बहुजन आघाडी, महिला आघाडी, सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटना हे देखील हजेरी लावतात.
यंदा भारतीय बौद्ध महासभेने जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाला या कार्यक्रमासाठी परवानगी मागितली. मात्र पोलीस प्रशासनाने परवानगी देण्याऐवजी त्यांच्यावर 149 नुसार नोटीस बजावली आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले.
शिवसेना नेते खासदार संजय राऊत दसरा मेळावा नेहमी सारखाच होईल, असे म्हणत आहेत. असे झाल्यास अकोल्यातील सभेला देखील प्रशासनाने परवानगी द्यायला हवी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
शिवसेना मेळावा घेऊ शकते, तर आम्हीही मिरवणूक आणि सभा करूच, असा इशारा वंचितचे प्रवक्ते राजेंद्र पातोडे यांनी दिला आहे. तसेच प्रशासनाकडून भारतीय बौद्ध महासभा आणि मला बजावलेल्या नोटिशीला कायदेशीर उत्तर देऊ, अस ते म्हणाले.