अकोला - देशातील व राज्यातील स्थितीसाठी सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधी पक्ष जबाबदार असल्याची टीका करतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी टीका केली. आरएसएसचा कार्यकर्ता सरसंघचालक मोहन भागवत यांचे नाव घेऊन त्यांच्यावर देशात घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटाचा आरोप करतो आणि या देशातील व्यवस्था त्याची साधी चौकशीही करीत नाही. यावरून या देशातील एकूण परिस्थिती गंभीर आहे, हे लक्षात येते असे ते म्हणाले.
हेही वाचा -मुख्यमंत्र्यांना शेतकरी म्हणजे काय हेच माहीत नाही, शरद पवारांचा टोला
नागपूर येथील दीक्षाभूमीवर दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम आटोपल्यानंतर अकोला येथे दुसऱ्या दिवशी धम्मचक्रप्रवर्तन दिन सोहळ्याचे आयोजन केले जाते. भारतीय बौद्ध महासंघाच्यावतीने अकोला क्रिकेट क्लब येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासंघ अध्यक्ष पी. जे. वानखडे होते. प्रमुख उपस्थितांमध्ये भंते बी. संघपाल, यु. बोराडे, जिजाऊंचे वंशज नामदेवराव जाधव, प्रा. अंजली आंबेडकर यांच्यासह आदी उपस्थित होते.
हेही वाचा -अकोला : कार-दुचाकी अपघातात भावाचा मृत्यू; बहीण व भाचा गंभीर
पुढे ते म्हणाले, बॅंका बुडत आहेत. मंदीची तीव्रता वाढत आहे, आणखीन किती परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर येथील सर्वसामान्य माणूस जागा होईल. या देशातील सर्वसामान्यांच्या ठेवी बँकेत असुरक्षित आहे. कापूस आयात करून देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणण्याचे धोरण हे सरकार राबवीत आहे. हे सर्व घडते ते या देशातील विरोधक संपल्यामुळे. परिस्थिती बदलायची असेल, मंदीतून बाहेर पडायचे असेल तर येथील विरोधक जिवंत असला पाहिजे. सर्वच येथे लुटारू आहेत. त्यामुळे सावध करण्याचे काम मी करतो, काय करायचे ते तुम्ही ठरवा, असे सांगून त्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात विरोधकांना बळ देण्याचे आवाहन जनतेला केले.
गुजरातच्या पोरबंदर येथील बंदरावर अमेरिकेतून आलेल्या कापसाच्या गाठी उतरल्या. चार हजार रुपये क्विंटलने जिनिंग केलेला कापूस या देशात आला. आणखी कापूस येणार आहे. अशा वेळी या देशातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांकडून वेड लागलेला व्यापारीच हमीभावाने कापूस घेईल. साडेतीन हजार रुपयांच्यावर कापसाचे दर जाणार नाही, असे भाकित करीत त्यांनी शेतकर्यांचा उत्पादनाचा खर्चही निघणार नाही, असे सांगितले. हे मान्य न करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना कोणत्याही मंचावर आव्हान देण्याची माझी तयारी असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले. प्रास्ताविक भारतीय बौद्ध महासंघ चे उपाध्यक्ष वानखडे यांनी केले. तर संचालन प्रा. एम. आर. इंगळे यांनी केले. या कार्यक्रमाला हजारो नागरिक उपस्थित होते.