अकोला- जिल्ह्यातील कारंजा व बाळापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना औषध फवारणी दरम्यान विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. बाळापूर तालुक्यातील तेजराव दादाराव तायडे व कारंजा तालुक्यातील आतिष अवधूत राठोड अशी या दोन शेतकऱ्यांची नावे असून, त्यांना अकोल्यातील 'सर्वोपचार रुग्णालयात' उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अकोल्यातील दोन शेतकऱ्यांना औषध फवारणीतून विषबाधा - सरकार
बाळापूर व कारंजा तालुक्यातील दोन शेतकऱ्यांना औषध फवारणी करत असताना विषबाधा झाल्याने त्यांना उपचारासाठी अकोल्यातील 'सर्वोपचार रुग्णालयात' दाखल करण्यात आले. दोन्ही शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्या कुटुंबीयांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
ईटीव्ही भारतला मिळालेल्या माहितीनुसार, बाळापूर तालुक्यातील 'नया अंदुरा' येथील शेतकरी तेजराव दादाराव तायडे हे आपल्या शेतात कापाशीवर फवारणी करत असताना त्यांना चक्कर येत होती. त्यांनतर त्यांना नातेवाईकांनी शेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना अकोल्यातील 'सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. अशाच प्रकारची घटना कारंजा तालुक्यात देखील घडली. कारंज्यातील 'वाघोळा वाकी' येथील शेतकरी 'आतिष अवधूत राठोड' हे सोयाबीनवर औषध फवारणी करत असताना, त्यांना रक्ताची उलटी आणि चक्कर आली. त्यानंतर त्यांना तातडीने कारंजा येथील आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु त्यांचीही तब्येत अधिक खालवल्याने त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्यातील 'सर्वोपचार रुग्णालयात' दाखल करण्यात आले.
या दोन्ही शेतकऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अल्पभूधारक असणाऱ्या या शेतकऱ्यांच्या कुटुंबीय व नातेवाईकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.