अकोला :पारस वीज निर्मिती प्रकल्पासाठी आवश्यक असलेले पाणी साठविण्याकरिता पारस येथे मन नदीवर धरण बांधण्यात आले आहे. या धरणाचे बॅक वॉटर मोठ्या प्रमाणात शहरातील नदीपात्रात साचलेले आहे. त्यामुळे येथे बारमाही पाणीसाठा असतो. शहरालगत हा परिसर आहे. या परिसरात मुले खेळतात. शहरातील मोहमंद दनियाल अब्दूल फैय्याज (९) व मोहमंद नवाब मोहमंद फईम (६) ही २ बालके खेळताना नदीपात्रातील पाण्यात बुडून मृत्यू पावले. या दोन बालकांचा शोध लागत नसल्याने त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला. परिसरात कुठेही ही मुले दिसली नाही. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध मन नदीजवळील बॅक वॉटरजवळ घेतला. त्याठिकाणी त्या मुलांची खेळणी तिथे मिळून आली. नातेवाईकांनी पाण्यात शोध घेतला असता या दोघांचेही मृतदेह मिळून आले. त्यानंतर तिथे उपस्थित बालकांच्या नातेवाईकांनी या दोघांचे मृतदेह पाहून हंबरडा फोडला.
नागरिकांचा राग अनावर :या घटनेनंतर बॅक वॉटर परिसरात संरक्षण भिंत बांधण्यात यावी, या मागणीसाठी नागरिकांनी मोठा जमाव केला. संतप्त नागरिकांना समजविण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु, जमाव ऐकत नसल्याने पोलिस निरीक्षक विनोद घुईकर यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. शहरातून वाहणाऱ्या नदीच्या तिरावर संरक्षण भिंत नाही. या ठिकाणी लहान मुले खेळायला जातात. या मुलांवर लक्ष ठेवण्यात येत नसल्याने बऱ्याच वेळा मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या परिसरात मुलांनी जाऊ नये, यासाठी पालकांचा नेहमीच प्रयत्न असतो. तरीही मुले ही पालकांची नजर चुकवून या ठिकाणी खेळण्यास जात असल्याचे समजते.