अकोला- भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास धडक देऊन त्याला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची थरारक घटना बुधवारी रात्री घडली आहे. ही घटना राष्ट्रीय महामार्गावरील हेंडज फाटा दरम्यान घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार नितीन डाबेराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. दरम्यान पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
धक्कादायक ! डोक्यात अडकला हुक; दुचाकी चालकास कंटेनरने नेले फरफटत.. - ठाणेदार रहिम शेख
भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास धडक देऊन त्याला तब्बल दोन किलोमीटर फरफटत नेल्याची थरारक घटना बुधवारी रात्री घडली आहे. यामध्ये दुचाकीस्वार नितीन डाबेराव यांचा जागीच मृत्यू झाला आहे.
कंटेनर क्रमांक (एनएल ०१/ए. बी १९३९) हा अमरावतीच्या दिशेने ट्रॅक्टर वाहून नेत होता. दरम्यान नितीन सुधाकर डाबेराव (वय (३९) रा. पळसो बढे) त्यांच्या दुचाकीने (एमएच २७/सीई १८७१) अमरावतीला जात होते. यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरने नितीन डाबेराव यांना एका बाजूने धडक दिली. त्यामुळे कंटेनरला असलेला हूक थेट त्यांच्या डोक्यात घुसला. हूकला अडकून राहिलेले मृत नितीन डाबेराव यांना कंटेनरने तब्बल दोन किलोमीटर पर्यंत फरफटत नेले. यावेळी ही बाब दुसऱ्या वाहन चालकाच्या लक्षात आली. त्याने कंटेनर चालकाला झालेल्या घटनेबाबत लक्षात आणून दिले. तेव्हा चालकाने कंटेनर थांबविला व डाबेराव यांचा मृतदेह महामार्गाच्या कडेला टाकून दिला.
या घटनेची माहिती मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले. अपघात झालेल्या ठिकाणापासून दोन किलोमीटर अंतरावर त्यांना मृतदेह आढळून आला. त्यानंतर ढाबा चालक सतनामसिंग निरांजनसिंग गील यांच्या तक्रारीवरून कंटेनर जप्त करुन पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले. महाकाय कंटेनरला दोन्ही बाजूला रेडिअम पट्टया व इंडिकेटर लाइट नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. चालकाविरुद्ध मोटर कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार रहिम शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार तेजराव तायडे करीत आहेत.