अकोला- नादुरुस्त खासगी प्रवासी बसला आयशर ट्रकने मागून जबर धडक दिली. त्यामुळे या अपघातात दोन जण गंभीर तर दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना रविवारी राष्ट्रीय महामार्ग क्र.६ वर कुरूम जवळील राजस्थानी धाब्याजवळ घडली. गंभीर जखमीमध्ये आयशर ट्रकच्या दोन तर किरकोळ जखमीमध्ये ट्रॅव्हल बसच्या आणि ट्रकच्या प्रत्येकी एका चालकाचा समावेश आहे.
औरंगाबादवरून नागपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्स बस क्र.(एमएच- २०, डीडी- ०७७०) या बसचा राजस्थानी धाब्यानजीक समोरचा टायर पंक्चर झाला होता. त्यामुळे बस रोडवर उभी होती. यावेळी बस चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा पंक्चर जॅक लावून टायर काढत होता. त्या दरम्यान नागपूरला जाणारा आयशर ट्रक क्र.(युपी- ७८, एफऐन- ०६७९) च्या चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपने चालवून उभ्या पंक्चर बसला जबर धडक दिली. यात आयशर ट्रकचे दोन चालक गंभीर तर एक चालक किरकोळ जखमी झाला. तर ट्रॅव्हल्स बसचा चालक व्यंकटेश मनोहर पतंगे हा जॅक बसविताना टायर घासल्याने जखमी झाला.