अकोला - जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या संचारबंदीच्या वेळेत बदल करून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात व्यापाऱ्यांनी केली आहे. उन्हाळा असल्याने ग्राहक लवकर निघत नसल्याने हा बदल करावा, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
संचारबंदीच्या वेळेत बदला करावा, व्यापाऱ्यांनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन जिल्हा प्रशासनाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दुकान सुरू देण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, सध्या उन्हाळा आहे. त्यामुळे ग्राहक सकाळी नऊ वाजता घरातून निघत नाहीत. परिणामी, व्यापारी सकाळपासून दुकान उघडून बसतात. ग्राहक येत नसल्याने त्यांचा वेळ वाया जात असून त्यांना आर्थिक भुर्दंड बसत आहे. तसेच ते दुपारी ही येत नाहीत.
आधीच अर्धा वेळ दुकान उघडून व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यात कोरोनामुळे व्यापाऱ्यांचेच नव्हे तर त्यांच्याकडे काम करणाऱ्या नोकरांवर ही परिणाम होत आहे. यावर उपाय काढणे आवश्यक आहे. यासाठी व्यापारी एकत्र आले. त्यांच्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी ही होते.
व्यापाऱ्यानी निवेदनात दुकान उघडण्याची वेळ सकाळी 11 ते सायंकाळी सात वाजेपर्यंत करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवधन पुंडकर, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर सुलताने, मनोहर पंजवाणी यांच्यासह व्यापारी उपस्थित होते.