अकोला- हिवरखेड येथे सतर्क नागरिकांनी काही अनोळखी व्यक्तींना बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना प्रत्यक्षरित्या पाहिल्याने त्यांनी ही माहिती तत्काळ वनरक्षकाला दिली. त्या माहितीवरून अकोट-तेल्हारा-सोनाळा रस्त्यावरील ढाब्याजवळ सापळा लावत वनविभागाने तिघांता ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून नऊ मृत पक्षी, पक्षी मारण्याासठी वापरण्यात येणारी बंदूक व एक वाहन जप्त करण्यात आले आहे.
हिवरखेड येथील नागरिकांनी काही अनोळखी व्यक्तींना बंदुकीने पक्ष्यांची शिकार करताना पाहिले होते. याबाबत त्यांनी तत्काळ वनरक्षकाला कळवले. त्यांनी पक्ष्यांची शिकार करून एका वाहनातून घेऊन जात असल्याची माहिती वनअधिकाऱ्यांच्या फिरत्या पथकाला मिळाली. त्यावरून अकोट-तेल्हारा-सोनाळा मार्गावली ढाब्याजवळ त्यांनी सापळा लावला. त्या ठिकाणी दुपारी संशयीत वाहनाची (क्र. एम एच 12 एम डब्ल्यू 8412) तपासणी केली. त्यावेळी वाहनात 6 रातवा पक्षी (नाईट जार), 2 पारवा पक्षी (ब्लू रॉक पीजन), 1 जंगली कबूतर (कोलार्ड डोव्ह), असे एकूण 9 पक्षी शिकार केलेल्या मृत अवस्थेमध्ये आढळून आले.