अकोला -सोन्याच्या गिन्नींचे आमिष दाखवून, पावणेसहा लाख रुपये घेऊन पळ काढणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत अटक केली आहे. या तिघांकडून लूटलेली अर्धी रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा सात लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोन्याच्या खोट्या गिन्नी दाखवून लूटणाऱ्या तीन जणांना अटक
सोन्याच्या गिन्नींचे आमिष दाखवून, पावणेसहा लाख रुपये घेऊन पळ काढणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 24 तासांच्या आत अटक केली आहे. या तिघांकडून लूटलेली अर्धी रक्कम, गुन्ह्यात वापरलेली कार आणि मोबाईल असा सात लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सुनील महादू चासकर (रा. अंबेगाव, पुणे) यांना मुख्य आरोपी संजू आणि गोपाल यांनी कमी पैशांच्या मोबदल्यात सोन्याच्या गिन्नी देतो असे सांगितले होते. त्यांनी चासकर यांना खोट्या सोन्याच्या गिन्नी दाखवल्या, मात्र त्या खोट्या असल्याचे लक्षात आल्याने चासकर यांनी त्या घेण्यास नकार दिला. त्यानंतर या दोन आरोपींनी त्यांना मारहाण करून, त्यांच्याकडील पाच लाख 80 हजार रुपये असलेली पिशवी घेऊन पळ काढला. याप्रकरणी त्यांनी मुर्तिजापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
दरम्यान तक्रार मिळताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला. मिळालेल्या माहितीच्या आधारो पोलिसांनी या प्रकरणात तिघांना अटक केली आहे. सुनील जाधव, सूरज चौधरी आणि दीपक कटके अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन लाख 20 हजार 500 रुपये आणि गुन्ह्यात वापरलेली कार व मोबाईल असा 7 लाख 35 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मात्र यातील मुख्य आरोपी संजू व गोपाल हे अद्याप फरार असून, त्यांच्या शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.