अकोला- जिल्ह्यातील वाढते कोरोना संकट पाहता आगामी गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करून 'एक मोहल्ला एक गणपती' अभियान राबविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले आहे.
यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, महापालिका आयुक्त संजय कापडणीस, निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उपविभागीय अधिकारी निलेश अपार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता गणोरकर आदी उपस्थित होते.
'एक मोहल्ला एक गणपती' योजना लागू करावी. सर्व गणेशोत्सव मंडळांनी गणेश मूर्ती ही चार फूट व घरगुती मूर्ती ही दोन फूट स्वरूपाची करुन मंडपाचा आकारही दहा बाय दहा फुटाचा करुन नित्य आरतीत केवळ दहा पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोरोना संक्रमणाचा वाढता धोका लक्षात घेता मंडपात सामाजिक अंतर राखत गणेश भक्तांचे सॅनिटायझेशन करण्यात यावे. मास्कचा वापर करावा, अश्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. या चर्चेत गणपती मूर्तीचे स्टॉल पूर्वीच्या जागेतच वेगवेगळ्या अंतराने लावण्याच्या सूचना पापळकर यांनी शिष्टमंडळास दिल्या.
गणेश मंडळांच्या सर्व प्रकारच्या परवानग्या एकाच छताखाली मिळाव्यात यासाठी सोमवारपासून (दि. 17 ऑगस्ट) महापालित एक खिडकी योजना कार्यान्वीत होत असून गणेश भक्तांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकाआयुक्त कापडणीस यांनी केले.
या बैठकीत मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंह मोहता, महासचिव सिद्धार्थ शर्मा, अॅड. सुभाषसिंह ठाकूर, विजय जयपिल्ले आदी उपस्थित होते.