अकोला - तेल्हारा तालुक्यातील खंडाळा येथील शेतशिवारात लावण्यात आलेल्या ठिबक सिंचनाच्या नळ्यांमध्ये दोन काळवीट अडकले होते. या काळविटांना जीवदान देण्यात अकोट वन्यजीव विभागाला यश आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी घडली होती. दोन्ही काळवीट टक्कर करीत होते, त्यामुळे त्यांच्या अंगाभोवती नळ्या आवळल्या.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -अकोल्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
खंडाळा शेतशिवारात मोठ्या प्रमाणात वन्यप्राण्यांचा सुळसुळाट असतो. त्यामुळे, येथील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सध्या येथील शेतकरी बागायती शेती करून विविध पिके घेत आहेत, त्यामुळे येथील परिसरात वन्यप्राण्यांचा खूप वावर आहे. काळवट, हरीण, रानडुक्कर, नीलगाय यांचा उच्छाद आहे. हा परिसर वनविभागाच्या लेखी बफर झोनमध्ये आहे. दोन काळवीट टक्कर करीत असताना त्यांच्या शरीराला ठिबक सिंचनाच्या आथरलेल्या नळ्या आवळल्या. त्यामुळे, हे दोन्ही काळवीट त्यातून स्वतःची सुटका करू शकले नाही. परिणामी, हे दोन्ही काळवीट त्याच ठिकाणी जमिनीवर पडून विव्हळत होते.
काळवीट अडकल्याची माहिती मिळताच अकोला वनविभागचे उपवनसंरक्षक के. आर. अर्जुना, सहाय्यक वनसंरक्षक सु. अ. वडोदे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वर्तुळ क्षेत्रातील अजय एन. बावणे, सी. एम. तायडे, ए. पी. श्रीनाथ, विकास मोरे, सोपान रेळे, राहुल बावणे, दीपक मेसरे या वनकर्मचाऱ्यांनी खंडाळा येथील शेतशिवारात येवून काळविटांच्या जवळ आल्यावर त्यांच्या अंगाला गुंतलेल्या नळ्या तोडून त्या दूर केल्या. काळविटांच्या अंगावरील नळ्या काढल्यानंतर त्या दोन्ही काळविटांनी धूम ठोकली. हा क्षण पाहून वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना आनंद झाला.
हेही वाचा -खत दरवाढ कमी करुन शेतकऱ्यांना सबसिडी द्या; 'वंचित'ची मागणी