अकोला - येथील बार्शीटाकळी तालुक्यातील कानशिवणी छबिले-टाकळी येथील गावात बिबट्याची दहशत अद्यापही कायम आहे. बिबट्याला पाहून विद्यार्थ्यांनी धूम ठोकली होती. या गंभीर घटनेची दखल वनविभागाने अद्यापही घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये वन विभागाच्या विरोधात रोष निर्माण झाला आहे. दोन महिन्यांपासून आणून ठेवलेला पिंजरा शोभेची वस्तू असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
हेही वाचा-सातारा लोकसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीची तारीख जाहीर, निवडणूक आयोगाची घोषणा
कानशिवणी छबिले-टाकळी येथील गावात बिबट दिसल्याबाबत ग्रामस्थांनी बार्शीटाकळी वनविभागाकडे माहिती दिली. त्यानंतर येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा वनविभागाकडे निवेदन देऊन मोकाट फिरणाऱ्या बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. परंतु, गेल्या दोन-तीन महिन्यांपासून या बिबट्याचा वावर गावातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. तर वन विभागाने गेल्या दोन महिन्यापासून आणून ठेवलेला पिंजरा तो एकाच ठिकाणी असून ती सध्या गावात शोभेची वस्तू बनली आहे. वनविभागाचे कर्मचारी गस्तिवर असल्याचा दावा ग्रामस्थांनी फोल ठरविला. तर बिबट्याचा बंदोबस्त लावला नसल्याने गावातील महिलाही भयभीत आहेत. तर मुले गेल्या चार दिवसांपासून शाळेत गेले नाहीत. त्यामुळे वनविभागाने या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त लावावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हेही वाचा-महाराष्ट्राच्या विधानसभेत आवाज बुलंद करणाऱ्या 'या' दिग्गज नेत्यांची भासणार उणीव
ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनावर वनविभागाचे बार्शीटाकळी आरएफओ लाड हे कोणतीच कारवाई करीत नाहीत, असा आरोप ग्रामस्थांनी केला. दोन महिन्यापासून ठेवलेला पिंजरा हा धूळ खात पडलेला आहे. शेतकऱ्यांना शेतात जाणेही कठीण झाले आहेत. "बिबट्याने मनुष्यवध केल्यावरच वन विभाग जागे होईल का?" असा प्रश्न ग्रामस्थांनी वन विभागाकडे केला आहे.