अकोला- शेजारी राहणाऱ्या दहा वर्षाच्या मुलासोबत अनैसगिक कृत्य करणाऱ्या नराधम शिक्षकास द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयाने दहा वर्षांची शिक्षा आज सुनावली. ही घटना बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत घडली. प्रवीण उर्फ दशरथ खंडारे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
लहान मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याप्रकरणी नराधम शिक्षकास दहा वर्षांचा कारावास - अकोला
प्रवीण उर्फ दशरथ खंडारे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे.
बाळापूर पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या गावामध्ये ऑक्टोबर २०१५ मध्ये प्रवीण उर्फ दशरथ खंडारे याच्या शेजारी राहणाऱ्या एका कुटुंबातील लहान मुलीची तब्येत खराब असल्याने तिला तिची आई अकोला येथे उपचारासाठी घेऊन आली. त्या मुलीचे आजी-आजोबा हे शेतात काम करण्यासाठी गेले होते. मोठा भाऊ घराच्या पायरीवर बसलेला होता. त्यावेळी शिक्षक प्रवीण उर्फ दशरथ खंडारे हा तिथे आला. त्याने त्या मुलाशी लाडीगोडी बोलून त्याला घरात नेले. तेथे त्याच्याशी अनैसर्गिक कृत्य केले. त्यानंतर त्याने त्या मुलाला यासंदर्भात कुठे वाच्यता केल्यास तुला मारेल, अशी धमकी दिली. त्या मुलाने दोन दिवस या घटनेबाबत कोणालाही काहीच सांगितले नाही. परंतु, त्याचे डोके सतत दुखत असल्याने त्याच्या आईने त्याला खासगी डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी त्याची तपासणी केल्यानंतर तो अस्वस्थ असल्याचे सांगत त्याच्या डोक्यावर बरडणं असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याच्या आईने त्या मुलाशी संवाद साधला असता त्याने घडलेली हकीकत आईला सांगितली. आईने बाळापूर पोलीस स्टेशन गाठले. शिक्षक प्रवीण खंडारेविरोधात तक्रार दाखल केली.
बाळापूर पोलिसांनी अनैसर्गिक कृत्य करणे आणि पोस्कोनुसार गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी मनीषा राऊत यांनी केला. त्यानंतर द्वितीय जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. जाधव यांच्या न्यायालयात सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध झाल्यानंतर न्यायालयाने आरोपी प्रवीण खंडारेला दहा वर्षांची शिक्षा व पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास सहा महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंडातील ४ हजार रुपये रक्कम ही पीडित मुलास देण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. सरकार पक्षातर्फे अॅड. मंगला पांडे व अॅड. आनंद गोदे यांनी काम पाहिले.