अकोला -जिल्ह्यात 30 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने आत्महत्या केल्याची गंभीर घटना नुकतीच समोर आली आहे. संबधीत रुग्णांचा चाचणी अहवाल दोन दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. तेव्हापासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र, त्याने आत्महत्येने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
संबधीत व्यक्ती ही आसाममधील नागाव जिल्ह्यातील रहिवासी होती. रुग्णाने दिल्लीच्या निझामुद्दीन भागातील तबलिगी मरकझमधील धार्मिक कार्यक्रमात सहभाग घेतला होता. शुक्रवारी रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. आज पहाटेच्या सुमारास स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्याचा प्रयत्न केला. गळा कापल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यांच्यावर तात्काळ उपचार सुरु करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
रुग्णाने नैराश्यातून किंवा तणावातून आत्महत्या केली असावी असा अंदाज वर्तवला जात असून सध्या पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. दरम्यान ही व्यक्ती 9 मार्च ते 7 एप्रिल दरम्यान जिल्ह्यातील बाळापूर येथील मदरशामध्ये थांबली होती. त्यामुळे व्यक्तीच्या संपर्कात आलेल्याचीही तपासणी करण्यात येत आहे. तसेच कुटूंबियांची लेखी परवानगी मिळाल्यानंतर मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार येथे करण्यात येणार असल्याचे अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र यांनी सांगितले.
भारतातील कोरोना साथीच्या आजारामुळे 5 हजार 700 हून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. दिल्लीतील निजामुद्दीन येथे 'मरकज' हा धार्मिक प्रार्थनेचा कार्यक्रम 13 मार्च ते 15 मार्चदरम्यान आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शेकडो लोक सहभागी झाले होते. यातील काही जणांना कोरोनाची लागण झाली होती. अनेकांचा मृत्यू झाला आहे. कार्यक्रमामध्ये सहभाग घेतलेल्या तबलिगी जमातीच्या सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याने संक्रमित लोकांची संख्या झपाट्याने वाढली आहे.