अकोला- शहरात कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. महिला रुग्ण दोन दिवसाआधी जर्मनीतून अकोल्यात परतली होती. मात्र, घरी तिची प्रकृती बिघडल्याने तिला सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्डात दाखल करण्यात आले आहे. तिच्या घशातील श्वासाचे नमुने तापसणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले आहेत.
मूळची अकोल्यातील रहिवाशी असलेली २४ वर्षीय तरुणी ही जर्मनीला नोकरीसाठी गेली होती. दोन दिवसांपूर्वी ती जर्मनीवरून भारतात पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरली. यानंतर ती थेट अकोल्यात पोहोचली. घरी आल्यावर तरुणीला ताप येण्यास सुरुवात झाली. प्रकृती खालावत असल्याने आपल्याला कोरोनाची लागण तर झाली नाही ना? असा संशय आल्याने शनिवारी तिने थेट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील कोरोना आयसोलेशन वॉर्डात धाव घेतली. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कोरोनाची प्राथमिक लक्षणे आढळल्याने तरुणीवर उपचार सुरू केले आहे. सध्या तरुणीची प्रकृती स्थिर असून तिला प्राथमिक उपचार दिले जात आहे.