अकोला - दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन आणि आरोग्य प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील सुपर स्प्रेडर व्यक्तींच्या कोरोना चाचणीला सुरुवात झाली आहे.
रुग्णसंख्येचा वाढता आलेख -
ऑक्टोबर महिन्यात राज्यभरात रूग्णसंख्या वाढीचा वेग मंदावला होता. त्यामुळे नागरिकांना आणि आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रूग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवाळीपूर्वी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा दिला होता. शिवाय कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक प्रतिबंधात्मक उपायदेखील राज्याच्या आरोग्य विभागातर्फे सुचवण्यात आले होते. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागातर्फे शहरातील विविध भागातील फेरीवाल्यांसह इतर 'सुपर स्प्रेडर' व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.