अकोला - जिल्ह्यातील बाळापूर मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या प्रचार सभेचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. या सभेला वंचितचे युवा नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी बाळापूर आपला बालेकिल्ला असून वंचितचे वादळ उभे राहिले असताना बाळापुरात किती राडा होणार या विचार करा म्हणत नागरिकांशी संवाद साधला. तसेच विकासाच्या मुद्द्यावरून सरकारची निवडणुकीमधील 5 वर्षांच्या आश्वासनांची पुणेरी भाषेत टर उडवली.
बाळापुर आपला बालेकिल्ला राहिलेला आहे. वंचित वादळ उभे राहिलेला असताना या बाळापुरमध्ये किती राडा होणार आहे याचा तुम्ही विचार करा. भारताचे उत्पन्न, भारताच्या अर्थव्यवस्थेची या मोदी सरकारने वाट लावली आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. असा टोला वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी सरकारला लगावला. जेव्हा आर्थिक मंदी आली तेव्हा भाजपने सगळीकडे ठीक सुरू आहे असे म्हणत ते टाळण्याचा प्रयत्न केला. पण, लोकांनी त्यांना डोळे उघडून बघा काय ठीक सुरू आहे ते, असे प्रश्न विचारले. विशेष म्हणजे, सुजात आंबेडकर यांची ही पहिलीच राजकीय सभा आहे. तसेच ते पहिल्यांदाच जाहीरपणे भाषण देत असल्याचा उल्लेख वंचितचे बाळापुर येथील उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी केला.
बाळापूर विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांच्या प्रचार सभेमध्ये सुजात बोलत होते. पुढे ते म्हणाले, या सरकारने उद्योगधंदे बंद पाडले आणि तुम्ही म्हणता की नागरिकांनी गाडी घेतली पाहिजे. म्हणजे आपल्या देशाची आर्थिक व्यवस्था चांगली राहील. 'अरे बाबा ये क्या चल रहा है' त्यापुढे जाऊन अर्थमंत्री म्हणाल्या, जर या देशाची आर्थिक मंदी घालवायची असेल तर तरुणांनी गाड्या घेतल्या पाहिजेत. मी त्यांना म्हटलं, ताई आमच्या महाराष्ट्रात येऊन बघा, डोळे उघडून बघा. रिक्षाचे भाडे भरता येत नाही, नवीन गाड्या कुठून विकत घ्यायच्या आम्ही. त्यांचे हे सर्व विश्लेषन एकूण मला एक प्रश्न पडतो की, या अर्थमंत्री नसून अनर्थमंत्री आहेत, असा टोला त्यांनी मारला.