अकोला:महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहीम करणे ही अतिशय अभिमानाची बाब आहे. एव्हरेस्ट सर करणे हे भल्याभल्यांना ही जमत नाही. परंतु, दृढनिश्चय, हिंमत, जिद्द असेल तर कोणतेही गोष्ट सहज शक्य होते. याचाच प्रत्य येथील वैद्यकीय क्षेत्रात वावरणाऱ्या साठीतील तीन जणांनी करून दाखविला आहे. विशेष म्हणजे, यामध्ये दोन महिलांचा समावेश आहे. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर केला असून त्यांच्या या कामगिरीने अकोल्याचेच नाव नाही तर राज्याचे नाव देशपातळीवर उंचावले आहे.
गिर्यारोहणाची खडतर मोहीम पूर्ण केली: येथील बालरोगतज्ज्ञ डॉ. सौ. अंजली राजेंद्र सोनोने आणि श्रीमती सुरेखा दिलीप सोनोने या एकाच कुटुंबातील दोन साठीतील महिलांनी जगातील अतिशय खडतर, धोकादायक अश्या एव्हरेस्ट बेस कॅम्पची गिर्यारोहणाची खडतर मोहीम तीन मे रोजी यशस्वीरीत्या पूर्ण केली. अकोल्याच्या गिर्यारोहण मोहिमेत एक नवा इतिहास त्यांनी रचला आहे. ज्या जिल्ह्यात दोन सक्षम महिला अधिकारी लाभल्या त्या जिल्ह्यातील ह्या दोन महिलांनी एकाच वेळी अशी धाडशी मोहिम फत्ते करणे ही पुर्ण जिल्ह्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. यांच्यासोबत डॉ. राजेंद्र सोनोने यांनीसुद्धा या गिर्यारोहणाच्या मोहिमेत भाग घेऊन, एकाच कुटुंबातील तिघांनी एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करण्याची ही प्रथमच वेळ आहे.
बेस कॅम्पवर तिरंगा फडकवला: हिमालयातील या अतिशय दुर्गम भागात, कधी खडकाळ तर कुठे दरीच्या अगदी काठावरून जात ही मोहीम फत्ते करण्यासाठी खुप मोठे धाडस लागते. जसे जसे समुद्रसपाटीपासूनवर जातो तसतशी हवा विरळ होऊन प्राणवायुचे प्रमाण खुप कमी व्हायला लागते. एक एक पाऊल टाकायला येथे दम लागतो. निसर्गाच्या लहरीपणाचा गिर्यारोहकांना येथे खुप अनुभव येतो. सोनोने कुटूंबियांना सुध्दा या सर्व विपरीत परिस्थितींचा सामना करावा लागला. पण न डगमगता, हिमतीने त्यांनी प्रसंगी सतत कोसळणाऱ्या पावसात आणि सतत होणाऱ्या हिमवर्षावात, उणे २०डिग्री तापमानातही आपली मोहिम आठ दिवसांत यशस्विरित्या फत्ते केली. त्यांनी एव्हरेस्ट बेस कॅम्पवर तिरंगा मोठ्या दिमाखात फडकवला.
सोशलमीडियावर केले लाईव्ह: विशेष म्हणजे, एव्हरेस्ट बेस कॅम्प सर करतानाचा प्रसंग त्यांनी सोशलमीडियावर लाईव्ह दाखवून सर्व मित्रमंडळींना ह्या ऐतिहासिक क्षणाच्या आनंदात सहभागी केले. या त्रयीने ही मोहीम २६ एप्रिल रोजी लुक्ला ह्या नेपाळमधील हिमालयाच्या अत्यंत दुर्गम भागातील गावातुन सुरू केली होती. लुक्ला, फाकडींग, नामचे बजार, तेंगबोचे, देबोचे, फेरीचे, दिंगबोचे, लोबुचे, गोरखशेप, काला पत्थर असे खडतर गिर्यारोहण मजल दरमजल करीत तीन मे रोजी एव्हरेस्ट बेस कॅम्पला ही त्रयी यशस्वीरीत्या पोहोचली. एव्हरेस्ट बेस कॅम्प हा समुद्रसपाटीपासून ५,३६४ मिटर एवढ्या उंचीवर आहे. जेथे वर्षभर चोहोबाजूंनी बर्फचबर्फ असून उणे २० डिग्री सेल्सिअस तापमान असते.