अकोला : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ( Vanchit Bahujan Aghadi President Prakash Ambedkar ) यांनी सरकारला सात दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. सरळ सेवा भरतीतून सुशिक्षित बेरोजगारांकडून वाढीव फीची वसुली थांबवावी, अन्यथा वंचित बहुजन युवा आघाडी ( Vanchit Bahujan Yuva Aghadi ) रस्त्यावर उतरेल, असा इशारा दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निधी उभारण्यासाठी सरकार खासगी कंपन्यांचा वापर करत असल्याचा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
सुशिक्षित बेरोजगारांना लुटण्याचा प्रकार : आज प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथे पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवरून सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, जिल्हा परिषद थेट सेवा भरतीतून ( Zilla Parishad Recruitment ) बेरोजगारांकडून 900 ते 1000 रुपये फी वसूल करत आहे. त्यामुळे या कंपन्यांना एकूण अडीचशे कोटींचा नफा मिळणार आहे. या कंपनीचा मालक कोण हे आठवडाभरानंतर सांगेल. बेरोजगार तरुणांना लुटण्याचे काम मंत्रिमंडळाकडून केले जात आहे. या कंपनीकडून निधी कसा जमा होणार आहे. याचा खुलासा मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी करावा, असा थेट सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. दिवसाढवळ्या सुशिक्षित बेरोजगारांना लुटण्याचा हा प्रकार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केले आहे.