अकोला - राज्य सरकारने अनलॉक ४ मध्ये मंदिरे उघडण्याबाबत कुठलाही निर्णय घेतला नाही. राज्य सरकारला मंदिराकडून पैसे पाहिजे, असा घणाघाती आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
महाराष्ट्रात वारकरी संप्रदाय व वंचित बहुजन आघाडीने मंदिरे खुली व्हावी, यासाठी आंदोलन केले. मुख्यमंत्री यांनी एसओपी तयार करून निर्णय घेतो, असे सांगितले होते. शासनाला मंदिराकडून पैसे हवे आहेत. मोठ्या संस्थांनी सरकारला पैसे दिले आहेत. केंद्र सरकारने अनलॉक ४ मध्ये मंदिरे खुली करण्याचे म्हटले होते. अनेक मोठ्या मंदिर संस्थांनी मंदिरे खुली केल्यास आम्हीच टेस्टिंग करू, एखादा भक्त हा जर पॉझिटिव्ह आढळला तर त्यावरही आम्हीच उपचार करू, शासनाला हवे तिथे हॉस्पिटल बांधून देण्यासही तयार आहे, असे सांगितले होते. मात्र, शासनाकडून त्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली नाही. मॉल, बाजारपेठ, दारूची दुकाने सुरू केलीत, मात्र मंदिरे बंद ठेवून धार्मिकतेबाबत आस्था नसल्याचे सरकारने दाखवून दिले आहे, असे मत प्रकाश आंबेडकर म्हणाले.