अकोला- राज्यात 22 जुलै रोजी अतिवृष्टी झाली. यामधील नुकसानग्रस्तांना मदत देण्यासाठी राज्य सरकारने 12 हजार कोटींचे पॅकेज दिले. हे पॅकेज फसवे असून याआधी भाजपा सरकारने दिलेले पॅकेजही फसवे होते. त्यातील मदत अद्यापही नागरिकांना मिळाली नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर यांनी आज केला आहे.
'जाहीर केलेले पॅकेज फसवे आहे'
जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्याशी नुकसानसंदर्भात निवेदन देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळ आले होते. यावेळी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर बोलत होते. पुढे ते म्हणाले, राज्यात झालेल्या ढगफुटीमुळे हाहाकार माजला आहे. तरीही हे सरकार झोपलेले आहे. शासनाने जे 12 हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले आहे, ते फसवे आहे. याआधी भाजप सत्तेत असताना त्यांनीही पॅकेज जाहीर केले होते. त्याचीही मदत अद्यापपर्यंत नागरिकांना मिळालेली नाही. याही पॅकेजमध्ये जो अन्याय सुरू आहे, पूरपीडितांचा सर्व्हे व्यवस्थित होत नाही. नुकसानीचे पंचनामेही होत नाही. खरडून गेलेल्या जमिनीचे सर्व्हे होत नाही. ते दुर्लक्षित होत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.