अकोला -राज्यभरामध्ये एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अकोल्यातील मध्यवर्ती बस स्थानकावर एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना अक्षरशः बसमध्ये बसू न देण्याचा प्रकार केला आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना बसमधून खाली उतरवले आहे. या प्रकारामुळे मात्र प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी पसरली. कर्मचारी आणि प्रवासी असा वाद बसस्थानकावर निर्माण झाला होता. तसेच बाहेरगावावरून आलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना ही स्थानिक कर्मचाऱ्यांना रोखले.
विविध मागण्या
राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनासुद्धा 28 टक्के महागाई भत्ता मिळाला पाहिजे. वार्षिक वेतनवाढ दोन टक्क्यांऐवजी तीन टक्के मिळाली पाहिजे. दिवाळीपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला पाहिजे. तसेच एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण झाले पाहिजे. एसटी कर्मचाऱ्यांना घरभाडे मिळाले पाहिजे, अशा प्रमुख मागण्या यावेळी कृती समितीच्यावतीने करण्यात आल्या आहेत. तसेच एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दर्जा द्यावा, अशी प्रमुख मागणी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे.
आंदोलनाचा आज दुसरा दिवस
या आंदोलनाचा आज दुसरा दिवस होता. या आंदोलनानिमित्त मध्यवर्ती बसस्थानकावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी बसमध्ये बसलेल्या प्रवाशांना अक्षरशः बाहेर काढले आहे. बसमध्ये बसू नये, असा अट्टाहास एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवाशांना केला. बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांनाही आतमध्ये बसू दिले नाही. तसेच त्यांना खाली उतरण्याच्या सूचना यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी केल्या. त्यामुळे बसमध्ये चढणारे प्रवासी हे खाली उतरले. परिणामी, बसमधील प्रवाशांना त्यांना ज्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणी जाता आले नाही.
भुर्दंड मात्र प्रवाशांना
बाहेरगावाहून आलेल्या बसेस येत होत्या. परंतु, त्यामध्येही प्रवाशांना बसू न देण्याचा प्रकार एसटी कर्मचाऱ्यांनी केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला होता. तसेच काही प्रवाशांनी तर एसटी कर्मचाऱ्यांसोबत वादही घातला. परंतु, थोड्या वेळाने हा वाद निवळला. या प्रकारामुळे मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे तसेच एसटी महामंडळाचे नुकसान झाले आहे. आंदोलन हे जरी एसटी कर्मचाऱ्यांचे असले तरी त्याचा भुर्दंड मात्र प्रवाशांना बसत आहे, हे यावरून दिसत आहे.