अकोला- कधीकाळी पानमळ्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अकोला जिल्हातील अकोट, हिवरखेड, दानापूर, सोगोडा यासह अनेक गावातील पानमळे आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. राज्यभरातून मागणी असलेल्या अकोला जिल्ह्यातील चविष्ट 'कपुरी पानाची' ओळख आता संपण्याच्या मार्गावर आहे.
पानवेलीवर येणारे बुरशीजन्य विविध रोग, कुठलेही संशोधित कीटकनाशके किंवा खते उपलब्ध नसल्याने दिवसेंदिवस पानवेलीचे उत्पादन कमी होत आहे. यासोबतच पीक विम्यामध्ये नसलेला समावेश यासह अन्य कारणामुळे जिल्ह्यातील पानमळे नामशेष होऊन पानउद्योग संपण्याची चिन्हे दिसत आहेत. दरवर्षी जिल्ह्यातील पानमळ्यातून विक्रमी उत्पादन होणाऱ्या 'पट्टी आणी कपुरी' पानांना राज्यभरातील बाजारातुन विक्रमी मागणी असायची. त्यामुळे अकोट आणि तेल्हारा तालुक्यातून रोज महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसेसवर पानांच्या पेट्या विक्रीसाठी राज्यभरात निर्यात व्हायच्या. परंतु, आज पानमळेच नामशेष होत असल्याने अकोट -तेल्हारा आगारातील एसटीचे उत्पन्नही कमी झाले आहे.