अकोला - राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशभरातच प्रतिबंधित एचटीबीटी बियाणांची सर्रास विक्री होत आहे. हे प्रतिबंधित बियाणे गुटखामाफियांकडून आणण्यात येत असल्याचा अहवाल अकोला जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तयार केला आहे. वरिष्ठांकडे हा अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे समजते. यामध्ये पोलिसांनी तस्करीचाही गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यामध्ये हिवरखेड आणि अकोट ग्रामीण येथे या बियाणाची लागवड केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
राज्यात प्रतिबंधित एचटीबीटी सारखी बियाणे शेतकऱ्यांपर्यंत पोहचत आहे. अनेक ठिकाणी या बियाणांची छुप्या पध्दतीने पेरणी होत आहे. हे बियाणे पेरल्यानंतर त्यावर फवारणी केल्यास इतर झाडेही जळून जातात. तसेच हे बियाणे वापरताना शेतकऱ्यांना खूप काळजी घ्यावी लागते. मात्र, या बियाणांची पेरणी केल्यानंतर ती करपली तर त्याची नुकसान भरपाई शासनाकडून दिल्या जात नाही.