अकोला - कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यामुळे अकोला महापालिकेने शनिवारी (12 जून) स्कायलार्क हॉटेल येथील कोविड केअर सेंटरवर कारवाई केली. हे कोविड सेंटर सील करण्यात आले. सध्या येथील आयसीयूमध्ये रुग्ण आहेत. पण तेथील रुग्ण बरे झाल्यानंतर तोही विभाग सील करण्यात येणार आहे. दरम्यान, या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.
नोटीशीकडेही दुर्लक्ष
टॉवर रोडवरील स्मार्ट ब्रेन्स हाऊस प्रा. लि. स्कायलार्क हॉटेल येथील कोविड केअर सेंटरमध्ये महानगरपालिकेच्या आरोग्य पथकाने पाहणी केली. यावेळी, या सेंटरच्या संचालकाने बॉम्बे नर्सिंग अॅक्टनुसार कोणतीही परवानगी घेतली नाही. तसेच, तिथे अतिदक्षता विभागासह कोविड केअर सेंटर सुरू केले असल्याचे आढळून आले. यावरून मनपा आरोग्य विभागाने संचालकाला 15 दिवसांची नोटीसही दिली होती. शिवाय त्याच्यावर दंडात्मक कारवाईही करण्यात आली होती. परंतू, संचालकाकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही. त्याने दिलेले स्पष्टीकरणही सुसंगत दिसले नाही.