महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जनावरांच्या पोटात गेलेले बरे म्हणत कलिंगडाच्या शेतात सोडली मेंढरे - watermelon firm in akola

संचारबंदीमुळे माल विकला न गेल्याने त्या शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला शासनाकडून मदतीची आस लागली आहे.

अकोला कलिंगड शेती
अकोला कलिंगड शेती

By

Published : May 20, 2021, 3:57 PM IST

Updated : May 20, 2021, 4:43 PM IST

अकोला -कोरोनारुग्णांची संख्या वाढत असताना राज्य सरकारने कडक संचारबंदी जाहीर केली. यामुळे अनेकांचे रोजगार गेले. तर शेतकऱ्यांचा माल घरात आणि शेतात पडून राहिला आहे. अशातच अवकाळी पावसामुळे ते पीकही खराब होत आहे. अकोट तालुक्यातील शिवापूर बोर्डी येथील युवा शेतकऱ्याने दोन एकरातील कलिंगड खाण्यासाठी मेंढरे सोडली. संचारबंदीमुळे माल विकला न गेल्याने त्या शेतकऱ्यांचे अंदाजे चार लाखांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे हा शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून त्याला शासनाकडून मदतीची आस लागली आहे.

व्यापार ठप्प

अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातल्या शिवपूर बोर्डी येथील शेतकऱ्याने आपल्या कलिंगडाच्या शेतात मेंढरे सोडली. मागणी मंदावल्याने व्यापारी शेतकऱ्यांच्या शेतावर फिरकेनासे झाले आहे. व्यापार ठप्प झाल्याने कवडीमोल किंमतीला ही कलिंगडे कोणी घेण्यास तयार नाहीत. उठावच नसल्याने हे पीक शेतात पडून राहिले आहे. पीक सडल्यापेक्षा जनावरांच्या पोटात गेलेले बरे, असे म्हणत शेतकऱ्याने आपल्या दोन एकर कलिंगडाच्या शेतात मेंढरे सोडली. या शेतकऱ्याचे तब्बल चार ते साडे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

सर्वत्र मार्केट थंड

येथील अनेक कलिंगड उत्पादक शेतकरी यावर्षी लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहेत. लाखो रुपयांची आमदनी देणारे पीक शेतात पडून राहिल्याने शेतकऱ्याचे मात्र मोठे नुकसान झाले आहे. फायदा होईल म्हणून शेतकऱ्यांनी कुणी एक एकर, कुणी दोन एकर तर कोणी चार एकर कलिंगड पिकाची लागवड केली. पीक उत्पादन चांगले आले आहे. मात्र, नेमके विक्री करण्याची वेळ आली आणि हा निसर्गाचा घाला आला. कोरोनामुळे हाहाकार उडाला सर्वत्र मार्केट थंड झाली. शेतकरीबांधवांच्या शेतावर येऊन घेऊन जाणारे व्यापारी कवडीमोल किंमतीने घेऊ लागले. आठ दहा रुपये किलोने घेणारे चार पाच रूपये किलो मागू लागले आहेत.

Last Updated : May 20, 2021, 4:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details