अकोला:मागील काही दिवसांपासून ६९ गावातील खारे पाणी जमा करण्यात येत असून, हे पाणी टॅंकरमधून नागपूरला दिंडीतून नेण्यात येणार आहे. हेच खारे पाणी स्थगिती देणाऱ्या उपमुख्यमंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिण्याची आणी त्याच पाण्याने आंघोळ करण्याची विनंती करण्यात येईल. दरवर्षी बाळापूर व अकोला तालुक्यात पाणी टंचाई निर्माण होत असल्याने बाळापूर तालुक्यातील ५३ गावे आणि अकोला तालुक्यातील १६ गावे अशा एकूण ६९ गावांसाठी जल जीवन मिशनअंतर्गत प्रादेशिक पाणीपुरवठा योजना प्रस्तावित करण्यात आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात या योजनेला सर्व मान्यता प्रदान करून निधीही मंजूर करण्यात आला होता.
असे आहे कामाचे नियोजन: ६९ गावांना पाणी पुरवठा योजनेसाठी वान प्रकल्पातून पाणी आरक्षित करण्यात आले आहे. ४३ कि.मी. अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्याचे नियोजन आहे. याला अनुसरून २७ कि.मी.अंतरापर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यात आली आहे. अंतर्गत २२८ पैकी १०८ कि.मी. अंतरापर्यंत जलवाहिनी टाकण्यात आली आहे. योेजनेतील नियमांप्रमाणे २१९ कोटींच्या या योजनेवर आतापर्यंत १२५ कोटींचा खर्च झाला असून, ९२ कोटी रुपये कंत्राटदाराला अदाही करण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळात काम स्थगित: आता पालकमंत्री स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्यानंतरही त्यांनी जिल्ह्यातील योजना स्थगित ठेवण्याचा आदेश दिला. त्यामुळे अकोला ते उपमुख्यमंत्री राहत असलेल्या नागपूरपर्यंत पायी दिंडी काढण्यात येणार असल्याचे, असे शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी सांगितले होते. त्यानुसार राजराजेश्वर मंदिरापासून या संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे.