महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विधानसभा: अकोल्यात केंद्रीय मंत्री धोत्रेंसह प्रकाश आंबेडकरांची प्रतिष्ठा पणाला - केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे

विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेचे ५ मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपचे ४ तर  वंचित बहुजन आघाडीचे एका जागेवर वर्चस्व आहे. या मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

अकोल्यात कोण मारणार बाजी

By

Published : Sep 30, 2019, 9:43 AM IST

Updated : Oct 2, 2019, 11:13 AM IST

अकोला - विधानसभा निवडणुकीचे बिगुल आता वाजले आहे. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अकोला जिल्ह्यात विधानसभेचे ५ मतदारसंघ आहेत. यापैकी भाजपचे ४ तर वंचित बहुजन आघाडीचे एका जागेवर वर्चस्व आहे. या मतदारसंघात केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी भाजपने पाचवा मतदारसंघही ताब्यात घेण्याची तयारी केली आहे, तर वंचितने भाजपकडे असणारे मतदारसंघ काबीज करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.

विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर युती आणि आघाडीत मतदारसंघावरून ओढतान सुरू आहे. तर वंचित बहुजन आघाडीच्या एकला चलो रे या भूमिकेने जिल्ह्यातील पाचही मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

अकोल्यात केंद्रीय मंत्री धोत्रेंसह प्रकाश आंबेडकरांची प्रतिष्ठा पणाला

अकोला पश्चिम मतदारसंघ
अकोला पश्चिम हा जिल्ह्याचे मुख्यालय असलेला विधानसभा मतदारसंघ पूर्णतः शहरी आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपचे गोवर्धन शर्मा येथून 39 हजार 953 मतांनी विजयी झाले होते. या लोकसभेत या मतदारसंघातून भाजपला सर्वात कमी पंधरा हजारांची आघाडी मिळाली होती. यावेळी या मतदारसंघातून भाजपकडून पाचव्यांदा आमदार असणारे गोवर्धन शर्मा महापौर विजय अग्रवाल, नगरसेवक हरीश आलिमचंदन, एड. मोतीसिंह मोहोता हे इच्छुक आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असताना हा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला होता. आता यावेळी हा मतदारसंघ कोणाच्या वाट्याला जातो याचा निर्णय झालेला नाही.

2014 च्या निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राष्ट्रवादीने येथे दावा केला आहे. राष्ट्रवादीकडून माजी उपमहापौर रफिक सिद्दीकी यांच्या नावाची चर्चा आहे. काँग्रेसकडून माजी महापौर मदन हरगड यांनीही उमेदवारी मागितली आहे. शहरात फारशी ताकद नसलेल्या वंचित बहुजन आघाडी कडून डॉ. रहमान खान यांचे नाव आघाडीवर आहे. शहरातील मूलभूत समस्यांचे मुद्दे याही निवडणुकीत गाजण्याची शक्यता आहे.

अकोला पूर्व मतदारसंघ
शहरी आणि ग्रामीण असा संमिश्र तोंडवळा असलेला मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेचा मतदारसंघ म्हणजे अकोला पूर्व. या मतदारसंघातून संजय धोत्रे यांचे भाचे रणधीर सावरकर हे सध्या आमदार आहेत. 2014 मध्ये युतीत सेनेच्या ताब्यातील या मतदारसंघात पहिल्यांदाच भाजपचे कमळ फुलले.

2014 च्या निवडणुकीत आमदार सावरकर हे २ हजार ४४० मतांनी विजयी झाले होते. याआधी १० वर्ष हा मतदारसंघ भारिप-बहुजन महासंघाच्या ताब्यात होता. लोकसभेत संजय धोत्रे यांना या मतदारसंघातून सर्वाधिक जवळपास ५० हजारांची आघाडी मिळाली. या मतदारसंघात भाजपकडून आमदार सावरकर यांच्याशिवाय माजी नगरसेवक गोपी ठाकरे, उमेदवारीच्या शर्यतीत आहेत. यावेळी शिवसेना दबक्या सुरात या मतदारसंघावर दावा करताना दिसत आहे. सेनेकडून माजी जिल्हा प्रमुख विजय मालोकार, उपजिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांची दावेदारी आहे. तर काँग्रेसकडून प्रमुख दावेदार असणारे माजी उपजिल्हाधिकारी अशोक मानकर यांचा समावेश आहे. याही निवडणुकीत ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरावस्था खारपाणपट्ट्यातील प्रश्न गाजण्याची शक्यता आहे.


अकोट विधानसभा मतदारसंघ
अकोट विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बाहेरचे म्हणत रणशिंग फुंकले. 2014 मध्ये सेना भाजप युती तुटली. सेनेचा हा मतदारसंघ भाजपने पटकावला. भाजपच्या तिकिटावर शेजारच्या अमरावती जिल्ह्यातील दर्यापूरचे प्रकाश भारसाकळे ३१ हजार मतांनी विजयी झाले. सध्या त्यांच्या विरोधात भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी बाहेरचे उमेदवार ठरवत त्यांच्यावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. भाजपच्या दावेदारामध्ये आमदार प्रकाश भारसाकळे, डॉ. रणजीत सपकाळ यांचे नाव चर्चेत आहे. युतीत हा मतदारसंघ शिवसेनेचा परंपरागत मतदारसंघ आहे. सेनेकडून डॉ. विनीत हिगणकर, अनिल गावंडे, दिलीप बोचे यांची नावे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसकडून प्रा. संजय बोडखे, महेश गनगणे यांनीही आपली दावेदारी ठोकले आहे. वंचितकडून जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या वाघोडे यांच्या नावाची चर्चा आहे. मागच्या पाच वर्षात ही मतदारसंघातील रस्ते उद्योग या समस्या या निवडणुकीत तशाच आहेत.


बाळापूर विधानसाभ मतदारसंघ
मत विभाजनामुळे वंचितला लॉटरी लागणारा मतदारसंघ म्हणजे बाळापुर. २०१४ मध्ये भाजप शिवसेना आणि शिवसंग्राम मध्ये मतविभाजन झालं आणि यातून भारिपचे बळीराम सिरस्कार हे ६ हजार ९३९ मतांनी विजयी झाले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या संजय धोत्रेंना या मतदारसंघात २३ हजा ५०७ मतांची आघाडी मिळाली. सध्या भारिप बहुजन महासंघ वंचितकडून बळीराम शिरस्कर यांच्यासह प्रदेश प्रवक्ते प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, डॉ. रहमान खान यांची नावे प्रामुख्याने आहेत. भाजपकडून जिल्हाध्यक्ष तेजराव थोरात, माजी आमदार नारायण गव्हाणकर, अशोक मंडले यांची नावे चर्चेत आहेत. शिवसेनेकडून जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांना पक्षाचा एबी फॉर्म दिला आहे. संदीप पाटील यावेळी शिवसंग्रामकडून उमेदवारीसाठी दावा करीत आहे.

काँग्रेसकडून बाळापूरचे नगराध्यक्ष ऐनुद्दीन खतीब यांचे नाव चर्चेत आहे. तर मतदारसंघावर दावा करणाऱ्या राष्ट्रवादीकडून जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे हे प्रमुख दावेदार आहेत. या मतदारसंघातील महत्त्वाच्या समस्या तश्याच असताना आतापर्यंत कोणत्याही राजकीय पक्षाने सकारात्मक प्रयत्न केलेले दिसत नाहीत.

मूर्तीजापूर मतदारसंघ
अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मुर्तीजापुर मतदारसंघात गेल्या १० वर्षापासून भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे हरीश पिंपळे हे येथून २ वेळा निवडून आलेत. 2014 मध्ये त्यांनी 12 हजार 888 मतांनी भारिप-बहुजन महासंघाचा पराभव केला. सध्या आमदार पिंपळे यांना मोठ्या पक्षांतर्गत विरोधाला सामोरे जावे लागत आहे. तर शिवसेनेकडून येथे बंडखोरी होण्याची शक्यता आहे. कारण भाजप कार्यकर्त्यांप्रमाणे शिवसेनेनेही पिंपळे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. सध्या भाजपसह इतर सर्वच राजकीय पक्षांमध्ये तिकिटांसाठी राजकीय साठमारी सुरू झाली आहे. भाजपमधून आमदार पिंपळे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रावण इंगळे, राजकुमार नाचणे यांची नावे चर्चेत आहेत. वंचितमधुन जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा अवचार या प्रमुख दावेदार आहेत. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. राष्ट्रवादीकडून रवी राठी इच्छुक आहेत. रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा मुद्दा याही निवडणुकीत ऐरणीवर असणार आहे.


पुढच्या महिनाभर अकोल्यात राजकीय रणकंदन बघायला मिळणार आहे. मात्र, प्रत्येक निवडणूक जिल्ह्यातील मूलभूत प्रश्नामुळे गाजली जाते. यावरचा राजकीय पक्षांनी मागितलेला मतांचा जोगवा सर्वच राजकीय पक्षांसाठी आत्मचिंतनाचा विषय आहे. यावेळी मात्र, भाजप सेनेसह, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि वंचितने प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पाचही ठिकाणच्या लढती तुल्यबळ होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Oct 2, 2019, 11:13 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details