अकोला- अकोला लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप, काँग्रेस, आणि वंचित बहुजन आघाडीचे तेच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. भाजपकडून विद्यमान खासदार संजय धोत्रे, काँग्रेसकडून हिदायत पटेल तर वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर यांनी उमेदवारी देण्यात आली. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला अशी अकोला मतदारसंघाची ओळख होती. मात्र गेल्या तीन दशकांत काँग्रेसचा उमेदवार निवडून येऊ शकला नाही. तर प्रकाश आंबेडकर यांनी स्वबळावर निवडणूक लढणे भाजपच्या पथ्यावर पडत गेले.
मतदार संघातील सद्याची राजकीय परिस्थिती -
अकोला लोकसभा मतदार संघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे. विद्यमान खासदार संजय धोत्रे हे चौथ्यांदा निवडणूक रिंगणात आहे. तर हिदायत पटेल हे दुसऱ्यांदा आपले नशीब आजमावणार आहे. तर राज्याच्या राजकारणात नवा पर्याय देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी तयार करणारे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर हे नव्यांदा या ठिकाणावरुन उभे आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या नावाखाली लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यभर लाखोंची सभा घेत त्यांनी एमआयएमला राज्यात भक्कमपणे पाय रोवण्यास संधी दिली आहे. त्यांच्या या राजकीय खेळीने काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप सेनेला अचंबित केले आहे. मात्र, आंबेडकरांनी अकोल्यात एकही सभा घेतली नाही.
काँग्रेसने ऐन वेळी हिदायत पटेल यांना उभे करून पुन्हा मुस्लिम समाजाला उमेदवारी दिली आहे. त्यामुळे अकोल्यातील लढाई आता २०१४ सारखीच राहणार आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ गेल्या तीन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवाराला निवडून देत आहे. राजकीय ध्रुवीकरनामुळे भाजपला येथे यश गाठता आले आहे. त्यामुळे अकोल्यातील यावेळची लढतही ही भाजपसाठी पोषक असल्याने ही लढत एकतर्फी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. तसेच अकोल्यातील प्रकाश आंबेडकर यांचे राजकारणीही संपल्यासारखे असणार आहे. त्यामुळे या तीनही उमेदवारांना विजयाची आशा लागलेली आहे. या तीनही उमेदवारांची राजकीय भविष्य या निवडणुकीच्या निकालावर अवलंबून असल्याने नेमक्या कोणत्या उमेदवाराचे नशीब उजळते हे पाहणे महत्वाचे ठरेल.